महाराष्ट्र गारठला! वातावरणात मोठा बदल, समुद्र सपाटीपासून 3.1 किमी उंचीवर चक्राकार वारे, थंडीचा कडाका वाढणार
राज्यात आणि मुंबईत थंडीने जोर धरला असून गेल्या सहा दिवसांत वातावरणात मोठा बदल झाला आहे. हवेतील कोरडेपणा आणि गारठा वाढला आहे.
मुंबईसह राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. शनिवारी किमान तापमानाची नोंद 16.2 अंश सेल्सिअस झाली आहे. हे तापमान सरासरीपेक्षा 5 अंशांनी कमी आहे. जळगावमध्ये राज्यातील सर्वात कमी म्हणजेच 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्याच्या विविध भागांत तापमानाचा पारा घसरला असून थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. जळगावमध्ये राज्यातील सर्वात कमी म्हणजे 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण असू शकते. आजही राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून थंडी कायम असून अंतर्गत भागातील किमान तापमानात लक्षणीय घट होताना दिसत आहे. पहाटेच्या वेळी गारवा वाढल्याने सध्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. निरभ्र आकाश आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांचा राज्यावरील प्रभाव वाढत असून त्यामुळे किमान तापमानात घट होत आहे. राज्यात पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले अकवान चक्रीवादळ आता शांत झाले असून उत्तर ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होते. मराठवाडा आणि परिसरात यामुळं समुद्र सपाटीपासून 3.1 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती होती. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड हवेमुळं उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असून मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे. तर, उर्वरित राज्यात तापमानात चढ-उतार सुरूच आहे.
राज्यसह नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीची हूडहूडी भरायला सुरुवात झाली असून दोन दिवसांपासून निफाडचा तापमानात सातत्याने घट होत आहे निफाडचे तापमान 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले असून त्या पाठोपाठ धुळ्यातही तापमानाचा पारा घसरला आहे.
थंडी शेतीसाठी पोषक
पावसाची नोंद अल्प राहिल्याने हवेतील कोरडेपणा व गारठा वाढला असून, या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम शेती तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
सध्याचे कोरडे व थंड हवामान तालुक्यातील रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक आहे. गहू व हरभरा पिकांना फुटवे येण्यासाठी व दाणे भरण्यासाठी 15 अंशांखालील तापमान वरदान मानले जाते. तसेच, तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या रांगद्वा व उन्हाळी कांद्याच्या रोपवाटिका व कांदा लागवडीसाठी ही थंडी पोषक आहे; यामुळे कांद्याची पात जोमदार वाढून कांदा पोसण्यास मदत होते. मात्र, सकाळी पडणाऱ्या दवामुळे कांद्यावर 'करपा' किंवा 'फुलकिडे' (थ्रिप्स) यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
कृषी तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी पिकांना एकाच वेळी भरपूर पाणी न देता हलके आणि योग्य वेळी सिंचन करावे, ज्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहील व पिकांचे थंडीपासून संरक्षण होईल. ही गुलाबी थंडी बळीराजाच्या आशा पल्लवित करणारी ठरत असली, तरी नागरिकांनी आरोग्याबाबत सतर्क राहणे तितकेच गरजेचे आहे.