शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरचे नाव बदलणार? उदय सामंतांनी दिले संकेत; म्हणाले, 'टायगर नाव काढलं की...'
शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरचे नाव बदलण्याची शक्यता आहे. तसे संकेत उदय सामंत यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरु झाल्यात. शिंदेंची शिवसेना ऑपरेशन टायगर 3.0 राबवणार असल्याची चर्चा आहे. अशातच याच ऑपरेशन टायगरचं नाव बदलणार असल्याचं सूचक वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय.
काही दिवसांपूर्वी उदय सामतांनी ऑपरेशन टायगरवर केलेल्या विधानानंतर राऊतांची प्रतिक्रिया समोर आली होती. आम्ही टायगर आहोत हे त्यांनी मान्य केलं. उड्या मारणारे माकडं नाही. असा टोला राऊतांनी लगावला होता. राऊतांच्या याच वक्तव्यानंतर आता सामंतांनी ऑपरेशन टायगरचं नाव बदलणार असं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता ऑपरेशन टायगरचं नवं नाव काय असणार याची उत्सुकता लागलीय.
'पक्ष प्रवेशाचा विषय काढला की तुम्ही त्याला ऑपरेशन टायगर म्हणता. म्हणून हल्ली मी त्याला काही बोलायचंच नाही ठरवलंय. ऑपरेशन टायगर नाव काढलं की समोरचा म्हणतो की उदय सामंतच काही तरी गडबड करतोय. त्यामुळं आम्ही ऑपरेशन टायगर हे नाव बदलण्याचा विचार करतोय,' असं मिश्किल वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.
'टायगर ऑपरेशन हे नाव आपल्याकडून आम्हाला मिळालं आहे. आम्ही जे ऑपरेशन करतो ते कोणाला कळतही नाही. कधीही शिंदे साहेब पक्ष प्रमुखाचा सोहळा करत असतात तो आम्हालादेखील माहिती नसतो. वेळ आणि तारिख जाहीर झाल्यावर आम्हाला कळतं,' असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
ऑपरेशन टायगरचं नवीन नाव काय असणार याची चाचपणी सुरू आहे. राज्यात आणि दिल्ली स्तरावरती जे ऑपरेशन झाले. त्यात खासदार, आमदार फोडण्यात आले आणि पक्ष प्रवेश झाला. त्यानंतर आता नगरसेवकांना शिवसेनेत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, असं समजतंय. कोकणातही आमदार भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याअनुषगांने चर्चा सुरू असल्याचंही समजतंय. त्यामुळं निश्चित्तच राज्यात ऑपरेशन टायगरच्या हालचाली सुरू आहेत, असं समजतंय.