भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने दुसरा अहवाल सादर केला आहे. पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस या समितीने केली आहे. संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना 7 ते 10 वर्षांच्या कारावासाची शिफारस करण्यात आली आहे. इतकेच नाही तर किमान 10 कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे. अनेक नवीन शिफारशी सुचवण्यात आल्या असून या लागू झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा तरुणांना होणार आहे.
त्यांना 5 कोटी दंड, 8 वर्ष बंदी
राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया पद्धतीत सुधारणा करण्यासाठी 4 सप्टेंबर 2026 रोजी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीने आपला दुसरा अहवाल 23 नोव्हेंबर 2026 रोजी शासनाला सादर केला आहे. अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना 5 ते 10 वर्षे कारावास आणि 50 लाखांपर्यंत दंडाची शिफारस करण्यात आली असून गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्थांना 5 कोटींपर्यंत दंड आणि 8 वर्षांसाठी बंदी घालावी असं सुचवण्यात आलं आहे. परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची शिफारस या समितीने केली आहे. गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे.
विशेष न्यायालय
परीक्षा गैरप्रकारांचे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची शिफारस करतानाच या शिफारशी लागू झाल्यास एमपीएससी परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस करण्यात आली असून दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना केली गेली आहे.
रिक्त पदांची माहिती वेळेत मिळण्यासाठी...
उमेदवारांसाठी 'आधार' किंवा 'महाआयडी'द्वारे (MahaID) एकदाच नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेत मोठे प्रशासकीय बदल सुचवण्यात आले असून रिक्त पदांची माहिती वेळेत मिळण्यासाठी इंटीग्रेटेड रिक्वेझिशन पोर्टल (Integrated Requisition Portal) विकसित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात...
सप्टेंबरअखेरपर्यंत विभागांनी भरतीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवावे, असंही सुवचण्यात आलंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्याची सूचना या समितीने केली आहे. परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक (व्हेन्यू बँक) तयार करण्याची शिफारस केली गेली आहे.
सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान
परीक्षा केंद्रांच्या निवडी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना करण्यात आली असून परीक्षा प्रक्रियेतील सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची शिफारस या अहवालामध्ये आहे. हे निर्णय घेण्यात आल्यास राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल. या शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल अपेक्षित आहेत.