महाराष्ट्रात आणखी एक वंदे भारत; प्रवासाचा वेळ 7 तासांनी कमी होणार, 9 स्थानके अन्, तिकीट किती? पाहा संपूर्ण वेळापत्रक
महाराष्ट्रातील पहिली स्लीपर वंदे भारत नोव्हेंबरपासून धावणार आहे. किती असतील तिकीट दर आणि स्थानके जाणून घ्या
बहुप्रतिक्षित बंगळुरू मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस एक नोव्हेंबरला उद्घाटन होत असून तीन नोव्हेंबर पासून रेल्वे नियमित होणार आहे. वंदे भारत स्लीपरमुळं पुणे ते बंगळुरू प्रवासाचा वेळ पाच तासाने कमी होणारा असून तेरा तासात प्रवास पूर्ण होईल. वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस महाराष्ट्रातून धावणारी पहिली स्लीपर एक्सप्रेस आहेत. कसं असेल वेळापत्रक जाणून घेऊयात.
मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसमुळं मुंबईवरुन थेट बंगळुरूला पोहोचता येणार आहे. सध्या मुंबई-बेंगळुरू प्रवासासाठी 24 ते 25 तासांचा कालावधी लागतो. मात्र या एक्स्प्रेसमुळं हे अंतर अवघ्या 13 ते 14 तासांवर येणार असून 7-8 तासांची बचत होणार आहे. या दोन्ही शहरांतील अंतर 1,118 किमी इतके आहे. मुंबईही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि बंगळुरू आयटी हब आहे. त्यामुळं ही दोन्ही शहरं देशासाठी महत्त्वाचे आहेत.
बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेन सोमवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे. गाडी क्रमांक 27652 बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेन बंगळुरूवरुन संध्याकाळी 11.45 वाजता सुटणार आहे. ही ट्रेन मुंबईत दुसऱ्या दिवशी 11.55 वाजता पोहोचेल. या ट्रेनचा एकूण प्रवासाचा वेळ 16 तास 10 मिनिटे इतका आहे. तर, मुंबईतून दर मंगळवारी सेवा नसेल.
बंगळूरू-मुंबई (गाडी क्र. 27652) : बंगळूरहून सायंकाळी 7.45 वाजता सुटेल. सोलापूरला पहाटे 4.20 पुण्याला सकाळी 8 आणि मुंबईला सकाळी 11.55 वाजता पोहोचेल.
मुंबई-बंगळूरू (गाडी क्र. 27651) : मुंबईहून रात्री 8.10 वाजता सुटेल. पुण्याला रात्री 11.40, सोलापूरला मध्यरात्री 3 आणि बंगळूरला दुपारी 12 वाजता पोचेल.
या ट्रेनमुळं बंगळुरू आणि मुंबई दोन्ही बाजूंनी प्रवाशांना रात्रीचा प्रवास करता येणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन 16 डब्यांची आहे. या ट्रेनमधून एकाचवेळी 823 प्रवासी प्रवास करू शकतात. ही ट्रेन अनंतपूर, गुंटकल, रायचूर, कलबुर्गी, सोलापूर, पुणे, कल्याण या स्थानकांवर थांबणार आहे. मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या 1,118 किमीच्या प्रवासासाठी तिकीट दर 2,600 ते 4,250 रुपयांपर्यंत असेल, अशी शक्यता आहे.