मुंबई लोकलमध्ये फिरत होती सराईत चोर, पोलिसांनी अटक करताच सापडलं घबाड
लोकलच्या लेडीज डब्यात चोरी करणारी सराईत महिलेला अटक करण्यात आली असून 14.38 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना अलर्ट करणारी बातमी समोर येतेय. लोकलच्या महिलांच्या डब्यात सराईत चोर फिरत होता. गर्दीची संधी साधत ही महिला लेडीज डब्यात चोरी करायची. पोलिसांनी या सराईत महिला चोराला अटक केली आहे. तसंच, तिच्याकडे 14.38 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
लोकलच्या महिला डब्यात प्रवासी महिलांच्या पर्सची चेन उघडून सोने चोरणाऱ्या सराईत महिलेला गुन्हे शाखा, कल्याण युनिट-3 ने अटक केली आहे. तिच्याकडून 110.62 ग्रॅम वजनाचे 14 लाख 38 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात 21 ऑक्टोबर रोजी एका महिला प्रवाशाने तक्रार दिली होती. उल्हासनगर ते सीएसएमटी लोकलने प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने तिच्या शोल्डर पर्समधून मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी कलम 305(C) BNS अन्वये गुन्हा नोंद होता.
तपासादरम्यान आरोपी महिला मानखुर्द, लल्लूभाई कंपाऊंड येथील असून ती मालुंग परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. तिला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तपासात तिने कर्जत रेल्वे आणि कल्याण रेल्वे येथील दोन गुन्ह्यांची कबुली दिली. तिच्याकडून 102.62 ग्रॅमची सोन्याची लड (13.34 लाख) आणि 8 ग्रॅमची लड (1.04लाख) जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर रेल्वे प्रवाशांनी आपल्या मौल्यवान सामानाची काळजी घ्यावी, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.
दिवा रेल्वे स्थानकातही चोरीच्या घटना
दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या दोन बुरखाधारी महिलांना ठाणे रेल्वे पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ अटक केली. मेघिता आरव काळे (22) आणि अनु बबन काळे (35, दोघी रा. येरवडा, पुणे) असे आरोपींचे नाव असून, पोलिसांनी त्यांच्याकडून 7 लाख 55 हजार रुपये किमतीची 5 सोन्याची मंगळसूत्रे हस्तगत केली आहेत.
21 ऑक्टोबर रोजी सकाळी सीएसएमटी स्लो लोकलच्या महिला डब्यात चढताना एका प्रवाशाचे मंगळसूत्र खेचून पळणाऱ्या दोन्ही महिलांना साध्या वेशातील महिला पोलिसांनी जागीच पकडले. चौकशीदरम्यान त्यांनी इतर गुन्ह्यांचीही कबुली दिली.