238 एसी लोकल मुंबईकरांना कधी मिळणार? समोर आली तारीख
मुंबईकरांचा लोकल प्रवासाबाबत एक नवीन माहिती समोर येतेय. नागरिकांना एसी लोकलसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
मुंबईकरांना एसी प्रवासासाठी आता आणखी वाट पाहावी लागणार आहे. एसी लोकल प्रवासाला अधिक आरामदायी करण्यासाठी 238 नव्या एसी लोकलची भर पडणार असली तरी त्यासाठी मुंबईकरांना आणखी दोन वर्ष वाट पाहावी लागणार आहेत. 238 नव्या एसी लोकल 2028 पर्यंत रेल्वेच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
पहिल्या एसी लोकल डिसेंबर 2027पर्यंत दाखल होण्याचा अंदाज असून त्या सध्या मुंबईत धावणाऱ्या एसी लोकलच्या डिझाइनप्रमाणे असतील त्यानंतरच्या 218 लोकलमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येणार असल्याचे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 238 एसी लोकल तयार करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीसोबत (आयसीएफ) सामंजस्य करार केला आहे.
एसी लोकल पहिल्यांदा मध्य रेल्वेवर धावणार की पश्चिम रेल्वेवर याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. प्रवाशांचा प्रतिसाद आणि मागणी याचा विचार करून त्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य रेल्वेवर सुमारे 1,820 उपनगरीय सेवा असून त्यापैकी 120 एसी लोकल आहेत. पश्चिम रेल्वेवर 1,414 उपनगरीय सेवा असून 147 एसी सेवा धावतात.
नवीन लोकलमध्ये सध्याच्या स्टीलच्या आसनांऐवजी कुशन सीट, प्रत्येक आसनासाठी मोबाइल चार्जिंगची सुविधा, सुधारित वातानुकूलन व्यवस्था आणि प्रवाशांसाठी माहिती व मनोरंजनाची सुविधा देणाऱ्या स्क्रीनचा समावेश आहे. पण, या सुविधांच्या प्रत्यक्ष लाभासाठी 2028 नंतरचा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे.
238 नव्या लोकल दाखल झाल्यानंतर एसी सेवांचा विस्तार होण्याची शक्यता आहे. तीन कारखान्यांमध्ये होणार अत्याधुनिक एसीच्या डब्यांची निर्मिती करण्यात येत आहे. एसी लोकल रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास आणखी सोयीचा होणार आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ), चेन्नई, रेल कोच फॅक्टरी (आरसीएफ), कपूरथळा, मॉडर्न कोच फॅक्टरी (एमसीएफ), रायबरेली या तीन कारखान्यात एसी डब्यांची निर्मिती होणार आहे.