'सहर शेखने वडिलांना घेऊन मुघलांकडे जावं, दिया मिर्झाने ईदवेळी...'; नितेश राणे संतापले!
दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया समोर आलीय. रोहित पवारांवर टीका, मत्स्य व्यावसायिकांना कर्जमाफी आणि मोदी-पवार संवादावरही भाष्य केलय.
अभिनेत्री दिया मिर्झाच्या पर्यावरणपूरक दिवाळीच्या व्हिडीओवरून सुरू झालेला वाद आता न्यायालयाच्या निर्देशानंतरही थांबण्याची चिन्हे नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिया मिर्झाचा हटवलेला व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्णयानंतर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मिर्झावर टीका केली. ईद, मोहरम आणि बकरी ईदच्या वेळीही तिने पर्यावरणाबाबत भूमिका मांडावी, असे ते म्हणाले. याशिवाय रोहित पवार, सहर शेख, राहुल गांधी आणि मत्स्य व्यावसायिकांच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले.
'सर्व धर्मांच्या सणांची काळजी घ्या'
दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत बोलताना राणे म्हणाले की, हा प्रश्न मुंबई महापालिकेला विचारला पाहिजे. व्हिडीओ अपलोड करण्याचा अधिकार आपल्याकडे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिया मिर्झा हिंदू सणांच्या वेळी पर्यावरणाची काळजी घेण्याचे आवाहन करते; मात्र ईद, रमजान, मोहरम किंवा बकरी ईदच्या वेळी अशी भूमिका घेताना दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला. सर्व धर्मांच्या सणांबाबत समान भूमिका घेतली तरच सर्वधर्मसमभाव दिसेल, असे राणे म्हणाले.
रोहित पवारांवर हज यात्रेचा उल्लेख करत निशाणा
रोहित पवार यांच्या भूमिकेवर टीका करताना राणे यांनी हज यात्रा, रमजान आणि पश्चिम बंगालमधील मशिदीच्या देणगीतील कथित अनियमिततेचा उल्लेख केला. या विषयांवर रोहित पवार बोलत नाहीत; मात्र हिंदू सणांच्या वेळीच भूमिका घेतात, असा आरोप त्यांनी केला. हिंदू सणांपुरतीच त्यांची भूमिका मर्यादित आहे का, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला.
सहर शेख यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य
इकडे हिरवेकरण करण्यासाठी तिला सुपारी दिली गेली आहे. मुघलाची आठवण येत असेल तर ती पाकिस्तानात गेली तर आम्हाला त्याची काळजी नसेल.असे हिरवे साप आम्हाला देशात नको आहे. मुघलाची आठवण येत असेल तर वडिलांना घेऊन मुघलाकडे गेली तर आमची हरकत नाही, असे राणे म्हणाले. ती हिंदू राष्ट्रांमध्ये निवडून आली ही ती विसरली असावी.. मुघलांना गाडून तयार झालेली ही शिवाजी महाराजांची भूमी.. आणि महादेवाची भूमी आहे. हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही हे त्यांनी आठवण ठेवावं नाहीतर असे पार्सल आम्हाला पाकिस्तान मध्ये पाठवता येतात, असेही ते पुढे म्हणाले.
राहुल गांधींवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. या संवादाचे राणे यांनी कौतुक केले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध जपण्याचा आदर्श मोदी यांनी घालून दिला आहे, असे ते म्हणाले. दुसरीकडे, राहुल गांधी यांच्या पंतप्रधानांवरील टीकेला उत्तर देताना 'वह कितना छोटा आदमी है, हमारे मोदी जी कितने बड़े हैं' अशी टिप्पणी त्यांनी केली.
मत्स्य व्यावसायिकांना शेतकऱ्यांप्रमाणे सवलती?
राज्यात मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला असून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती आणि कर्जमाफीच्या धर्तीवर मत्स्य व्यावसायिकांनाही लाभ देण्याचा सरकारचा विचार असल्याचे राणे म्हणाले. मत्स्यबीज उत्पादनासाठीही मदतीची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित निकषांमध्ये बदल करून मत्स्य व्यवसायासाठी मदतीची व्याप्ती वाढवल्याचा दावाही त्यांनी केला.