...तातडीने हस्तक्षेप करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, 'माझा स्पष्ट विरोध...भ्रष्टाचाराचा संशय '
समुद्रात "तरंगते होर्डिंग्ज" लावण्याला आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवला असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे.
समुद्रात "तरंगते होर्डिंग्ज" लावण्याला आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवला असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. मुंबईचं नैसर्गिक सौंदर्य विद्रूप करणाऱ्या ‘तरंगते होर्डिंग्ज’च्या निर्णयाला आपला तीव्र विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच या निर्णयात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं पत्र शेअर केलं आहे.
पत्रात काय लिहिलं आहे?
समुद्रात "तरंगते होर्डिंग्ज" लावून मुंबईचे नैसर्गिक सौंदर्य विद्रूप करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोधाबाबत आणि तातडीने हस्तक्षेप करण्याबाबत हे पत्र असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. समुद्रात "तरंगते होर्डिंग्ज" लावून शहराचे सौंदर्य विद्रूप करण्याच्या निर्णयाला माझा स्पष्ट विरोध दर्शवण्यासाठी मी आपल्याला हे पत्र लिहीत आहे असं ते पुढे म्हणाले आहेत.
"पहिली गोष्ट म्हणजे, सतत वाढणारे प्रदूषण आणि त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे, किनारपट्टीपासून थोड्या अंतरावरूनही आता शहरातील बहुतांश भागातून समुद्र व्यवस्थित दिसत नाही. अत्यंत दुर्दैवाने, होर्डिंग कंत्राटदारांच्या टोळीला पाठिंबा देण्याच्या ह्या अवाजवी आणि 'व्यावसायिक हित' जपणाऱ्या निर्णयामुळे, जे काही थोडेफार चित्तवेधक दृश्य उरले आहे, तिथेही नागरिकांच्या डोळ्यांसमोर फक्त जाहिरातीच दिसतील. जमिनीवरील बेसुमार प्रदूषण आधीच सहन करणाऱ्या मुंबईकरांवर हा आणखी एक अन्याय आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
"वास्तविक पाहता, शहरात रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास देणाऱ्या एलईडी होर्डिंग्जवर नियंत्रण ठेवणारे आणि संपूर्ण मुंबईत होर्डिंग्जच्या संख्येवर मर्यादा घालणारे एक निश्चित धोरण असायला हवे. कंत्राटदारांच्या आर्थिक हितापेक्षा शहराचे सौंदर्य आणि नैसर्गिकता जपण्याला प्राधान्य देणे हाच नियम असायला हवा, परंतु दुर्दैवाने हा नियम सौंदर्याऐवजी कंत्राटदारांची निवड करतो," असा आरोप त्यांनी केला आहे.
माझी आपल्याला विनंती आहे की आपण यात तातडीने हस्तक्षेप करावा आणि अत्यंत बेजबाबदार, संभाव्य भ्रष्टाचाराचा संशय असलेला आणि मुंबईचे सौंदर्य नष्ट करणारा हा निर्णय थांबवावा अशी विनंती त्यांनी केली आहे.