गुरुवारी मुंबईमध्ये 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकाच मंचावर हजेरी लावली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. मात्र यासंदर्भातून बोलताना भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंही एकत्र येऊ शकतात अशी शक्यता एका माजी खासदाराने बोलून दाखवली आहे. वारशाचा उल्लेख करत या माजी खासदाराने हा दावा केलाय. यासाठी एक गोष्ट कारणीभूत ठरु शकते असंही या माजी खासदाराने म्हटलं आहे.
ही सूज कमी करण्यासाठी
पुण्यामधील पदवीधर मतदारसंघाच्या पराभवानंतर भारतीय जनता पार्टीने आज चिंतन बैठक आयोजित केली आहे. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर तसेच मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच पुणे शहर प्रमुख रविंद्र धंगेकरांनी 'झी 24 तास'शी विशेष बातचीत केली. "आज भाजपाची चिंतन बैठक होत असून या बैठकीला मला बोलवावं," अशी मागणी धंगेकरांना केली आहे. "मित्रपक्षात काय चाललंय हे जाणून घ्यायचं आहे. खऱ्या अर्थाने खदखद बाहेर पडतेय. ही सूज कमी करण्यासाठी प्रॉपर ऑपरेशन केलं पाहिजे. मागवलं तरी मी दोन लेखी सूचना देईल," असं धंगेकर यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यामागील इच्छेसंदर्भात म्हटलं आहे.
मित्रपक्षाचे लई हाल करु नका
"पदवीधरमध्ये अपयश आलं यासाठी बैठक बोलवली आहे. मित्रपक्षाची खदखद जाणून घेण्यासाठी, मित्रपक्षांना योग्य न्याय दिला जात नसेल तर अशा गोष्टी घडतात. सगळंच मला पाहिजे, इतरांना काही नको अशी भूमिका असेल तर पक्ष नेतृत्वाने विचार केला पाहिजे," असं धंगेकरांनी म्हटलं आहे. "कार्यकर्ता म्हणून जे दिसतंय हे ते चांगलं नाही. विरोधकांवर कुरघोडी केली पाहिजे तर मित्रपक्षांवरच केली जात आहे. मित्रपक्षाचे लई हाल करु नका अशी विनंती आहे. त्यांचाही विचार करा. भविष्यात पक्ष योग्यरीतीने चालवायचा तर मित्रपक्षाला संभाळलं पाहिजे. दरी पडू देता कामा नये. मान-सन्मान केला पाहिजे," अशी अपेक्षा धंगेकरांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरे एकत्र यावर काय बोलले?
"मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले," असं म्हणत गुरुवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर धंगेकरांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी, "हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी महाराष्ट्राला परंपरा आणि चांगले दिवस आणण्याचे प्रयत्न केले. मधल्या काळात एकमेकांशी संवाद तुटत चालला होता अशी भीती वाटत होती. कालचं चित्र पाहून बरं वाटलं. महाराष्ट्राच्या राजकारणाला अशीच वैभवशाली किनार राखली पाहिजे. विरोधकांनी, सर्वांनी एका व्यासपीठावर येऊन संवाद साधावा असं वाटतं," अशी इच्छा धंगेकरांनी व्यक्त केली.
ठाकरे-शिंदे भावासारखे
गुरुवारच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे नव्हते यावरुन प्रश्न विचारताना, "एकनाथ शिंदेंना एकटं पाडलंय का?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर धंगेकरांनी, "नाही, एकनाथ शिंदेंना पण बोलवतील. ज्यांनी बोलवलं या तिघांना बोलवलं पुढल्या वेळी सर्वांना बोलवतील. सर्वांनी एकत्र यायची मानसिकता ठेवली तर यापेक्षाही चांगलं होईल.
उद्धव साहेब हे शिवसेनाप्रमुखांचे रक्ताचा वारसदार आहेत. एकनाथ शिंदे हे विचारांचे वासरदार आहेत. दोघे भावासारखेच आहेत. भविष्यात हे ही एकत्र येऊ शकतात," असं मत व्यक्त केलं.
2029 च्या आधी एकत्र?
यावरुन, "2029 च्या आधी एकत्र येऊ शकतील?" असा प्रश्न धंगेकरांना विचारण्यात आला असता त्यांनी, "शेवटी राजकारण आणि समाजकारण आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आले तर महाराष्ट्राला आवडेल. ते मलाही आवडेल, तुम्हालाही आवडेल. आपल्याला महाराष्ट्राचं हित महत्त्वाचं आहे," असं म्हणत ठाकरे-शिंदे एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या हिताच्या कारणासाठी येतील असं नमूद केलं आहे.