'फडणवीस इतक्या खालच्या स्तराला जातील असं वाटलं नव्हतं'; संजय राऊतांचा संताप, म्हणाले 'त्यांचा वडिलांबाबतचा दावा...'
गोकुळमधील सत्तासंघर्षावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
गोकुळमधील सत्तासंघर्षावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस इतक्या खालच्या स्तराला जातील असं वाटलं नव्हतं अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. तसंच त्यांच्या वडिलांनी खरंच आणीबाणीच्या संघर्षात भाग घेतला होता का? अशी शंकाही उपस्थित केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिमा डागळून काळी होऊन देऊ नये असंही ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
"राज्यपाल संविधानिक पदावर बसलेले आहेत. लोकशाहीची, जनमताची, मतदानाची चाड असेल तर राज्यपाल त्या अध्यादेशावर सही करणार नाहीत. सध्याच्या राज्यकर्त्यांनी लाजलज्जा शरम यांची कोणतीही फिकीर न करता गोकुळचा जनमताचा कौल फेटाळून लावला आहे. आम्ही जे म्हणतो लोकशाही धोक्यात आहे ते यासाठीच," अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
"देवेंद्र फडणवीस इतक्या खालच्या स्तरावर जातील असे वाटले नव्हते. चंद्रकांत पाटील यांचं समजू शकतो. पण फडणवीस ज्यांच्या वडिलांनी आणीबाणी संघर्षात भाग घेतला असा दावा करतात. पण आता मला शंका येऊ लागली आहे. जर ते लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी लढले असतील तर मग त्यांचे चिरंजीव लोकशाहीने दिलेला कौल अशापक्रारे चिरडून टाकत असतील तर वडिलांच्या संघर्षाच्या, त्यागाचा अपमान असेल," असंही ते म्हणाले आहेत.
"फडणवीस म्हणतात बैठकीसाठी 14 चा कोरम लागतो. पण लोकांनी कौल दिला आहे. कोरम पूर्ण होऊ नये देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करुन समविचारी पॅनेलच्या किमान 2 जागा चोरल्या आहेत. हे कारस्थान फार आधीपासून सुरु आहे. काही ठिकाणी 5, 6 मतांनी निर्णय फिरवण्यात आले, ते कोरम पूर्ण होऊ नये म्हणून होतं. 13-12 असलं तरी बहुमत आहे. समजा 13 महाडिकांच्या आणि 12 सतेज पाटलांच्या पॅनेलला असते तरी त्यांनी हा 5 सदस्य नेमण्याचा निर्णय घेतला असता का? तेव्हा त्यांना बहुमताचा साक्षात्कार झाला असता. पण आपण पराभव पचवू शकत नाही आणि ज्या हारल्या आहेत शौमिका महाडीक, नवीद मुश्रीफ त्यांनी शासकीय सदस्य म्हणून संधी देत आहात. फडणवीस यांनी आपल्या प्रतिमेला डागळून काळीकुट्ट होऊन देऊ नका. काळकुट्ट वर्तन त्यांनी करु नये," असंही ते म्हणाले आहेत.
हा डेडलॉक नाही
"हा डेडलॉक नाही. हे फक्त हसन मुश्रीफ आणि महाडीक यांच्यासाठी सुरू आहे. गोकुळ हे अमूलच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे आणि ते नको होऊ द्यावे म्हणून सतेज पाटील लढले. कोल्हापूरचे गोकुळ गुजरातच्या घशात जाऊ नये म्हणून कोल्हापूरकरांनी निवडून दिले आहे. महानंद यांनी आधीच विकून टाकले आहे," असा आरोपही त्यांनी केला आहे.
फडणवीस यांना याची किंमत मोजावी लागेल
जर सतेज पाटील यांनी मुंबईतील नेत्यांना मोर्चासाठी बोलावले तर जाऊ. पण तिकडचे नेते मंडळी जातील. गोकुळचो लढाई ही महत्वाची आहे. लोकशाहीचा कौल मानवाच लागेल. फडणवीस यांना याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.