राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच पक्षाच्या बड्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ , हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे या नेत्यांचा बैठकीत समावेश होता. विशेष म्हणजे, मुंबईत सोमवारी पक्षाची बैठक असताना नेत्यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्यानं या घडामोडींचं महत्त्व वाढलं. मात्र या महत्वपूर्ण भेटीवेळी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार उपस्थित नव्हते.
दिल्लीत अमित शाहांकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पार्थ आणि सुनेत्रा पवारांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षात वरिष्ठांना डावलून कारभार सुरू असल्याची तक्रार अमित शाहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता, युवती अध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय युवक प्रदेशाध्यक्ष ही पदं निवडीच्या प्रक्रियेत पार्थ पवारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना डावलल्याची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर पक्षात नाराजी असून सर्वांना सोबत घेऊन काम करा अशी भूमिका नेत्यांनी मांडली आहे. पदनिवडीबाबत विश्वासात न घेतल्याची त्यांची भूमिका आहे.
मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची निवड करताना किमान पक्षाच्या कोअर कमिटीतील सदस्यांना विश्वासात घेणे अपेक्षित होते मात्र परस्पर निवड करण्यात असल्याने नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून जेष्ट नेत्यांशी योग्य समन्वय साधून निर्णय घेतले जातील असं आश्वासन देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबईचे नेतृत्व एकूण 36 आमदार करतात या मुंबईच्या अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी यांची निवड करता? असा सवाल वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत विचारला असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या भेटीबाबत प्रतिक्रिया दिलीय. आमच्यात नाराजीचं कोणतंही कारण नाही, असं तटकरे म्हणालेत. संघटनेतल्या नियुक्तीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही भावना मांडल्यात. अर्थखात्यावर निर्णय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या कामकामाजावर बैठकीत चर्चा झाल्याचंही तटकरे म्हणाले आहेत.