टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, मनी लाँडरिंगसंदर्भात मुंबई पोलिसांना यश
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मनी लाँडरिंगसंदर्भात मुंबई पोलिसांना यश मिळालं आहे.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणात मुंबई पोलिसांची धडपकड अजून सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य शूटर फूल सिंह आणि रेहानने चौकशी दरम्यान दावा केला की, टायगर श्रॉफची हत्या करण्याचा त्यांचा कट नव्हता. फक्त त्यांना टायगर श्रॉफसोबत बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करायची होती. आता याप्रकरणात पोलिसांनी 12 व्या आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात 12 व्या आरोपीला सोनीपतमधील रोहना गावातून अटक करण्यात आली आहे. हा 12 व्या आरोपी अटकेतील कुणाल नावाच्या व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहारात सहभागी होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी सोनीपतमधून त्याला अटक केली आहे. या आरोपीचं नाव अमन असं असून त्याला लवकरच मुंबईत आणण्यात येईल.
हेसुद्धा वाचा - टायगर श्रॉफवर फुटबॉल मैदानातच हल्ला करणार होते पण...; तपासात मोठा खुलासा
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाची चौकशी मुंबई गुन्हे शाखा करत असून 11 आरोपींविरुद्ध MCOCA कायद्याची कलमे लावण्यात आली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल पंडित फरार आहे. टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता जुहू परिसरात गोळीबार करण्यात आला होता. अभिनेता फूटबॉल खेळून मैदानाबाहेर आपल्या कारने बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर गोळी झाडण्यात आला. या गोळीबार हल्ल्यात एक चाहता आणि अभिनेत्याचा डायव्हर गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यातून टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप शेअर करत लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य अनिल पंडित याने सलमान खानसोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला मारण्याची या ऑडिओ क्लिपमधून धमकी दिली. अनिल पंडितला टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित केले गेलं आहे.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे हे बिहार, हरियाणासह अनेक राज्यांपर्यंत पोहोचले आहेत. 12 व्या आरोपी अमनलाही हरियाणातून अटक करण्यात आली आहे. आता अमनच्या चौकशीतून कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहावे लागणार आहे.