टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात आरोपींबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. आरोपींचे नेपाळ कनेक्शन समोर आले आहे.
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात आरोपींनी मोठा खुलासा केला आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या चौकशीत समोर आले आहे की, टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर आरोपी लपण्यासाठी नेपाळमध्ये जाणार होते. तसंच, हल्ला करण्याआधीही ते तीन ते चार दिवस नेपाळमध्ये राहिले असल्याचं समोर आलं आहे.
अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात अटक असलेल्या आरोपींसाठी नेपाळमध्ये लपण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गोळीबाराची घटना घडवण्यापूर्वी आरोपी नेपाळमध्ये 3 ते 4 दिवस मुक्कामाला होते. आरोपींना आधी नेपाळमध्ये नेण्यात आले होते, अशी माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे.
टायगर श्रॉफवर गोळीबार केल्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने पुन्हा नेपाळमध्ये यायचे, अशी आरोपींना सूचना देण्यात आली होती. नेपाळमध्ये परतल्यानंतर गँगमधील सदस्य आरोपींना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणार होते, अशी माहितीही समोर येत आहे.
भारतीय तपास यंत्रणांना पकडता येणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी आरोपींना लपवण्याचा गँगचा प्लॅन होता. गोळीबारानंतर आरोपी ऋतिक कुमार, फूलसिंह नरेश आणि रेहान अन्सारी उर्फ सुक्का हे नेपाळच्या दिशेने पळून जाण्याऐवजी कोटाच्या दिशेने पोहोचले. त्यानंतर कोटा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात लॉरेंस बिश्नोई गँगच्या नेपाळमधील सुरक्षित आश्रयस्थानाचा खुलासा चौकशीत समोर आला आहे.
टायगर श्रॉफ गोळीबाप्रकरणी शस्त्रांसह एकास अटक
अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी आरोपींच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेने आग्रीपाडा परिसरातून गणेश श्रीकांत लांडगे (31) या वाहन चालकाला अटक केली. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि 19 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणात अटक झालेला तो 14 वा आरोपी आहे. या प्रकरणातील त्याचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. त्याच्याबरोबर असलेले अन्य तीन जण पोलिसांना चकवा देऊन पसार झाले.
फरार आरोपीविरोधात लुक आऊट सर्क्युलर (LOC) जारी
मुंबई पोलिसांनी टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अभिषेक पंडितविरोधात लुक आऊट सर्क्युलर (LOC) जारी केले आहे. तो अनिल पंडितचा भाऊ असून, अनिल पंडित हा या टोळीच्या आर्थिक व्यवहारांमागील सूत्रधार असल्याचा आरोप आहे.
गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींसाठी निधीची व्यवस्था करण्यास मदत केल्याचा अभिषेक पंडितवर संशय आहे. मुंबई गुन्हे शाखेने अभिषेक पंडितला अटक करण्यासाठी हरियाणातील कर्नाल येथे धाव घेतली होती, परंतु पोलीस त्याला पकडण्यापूर्वीच तो पळून जाण्यात यशस्वी झाल्याचा आरोप आहे.