समुद्रातून जाणाऱ्या उत्तन-विरार मार्गाबाबत मोठी अपडेट; खर्च कमी करण्यासाठी प्रकल्पातच बदल, 20 हजार कोटी...
उत्तन विरार सागरी सेतू मार्गाऐवजी होणार आता 'कोस्टल रोड'. का घेण्यात आला असा निर्णय, जाणून घेऊयात.
दक्षिण मुंबईहून थेट पालघरपर्यंत विनाथांबा पोहोचण्यासाठी उभारण्यात येणारा उत्तन विरार मार्ग समुद्राऐवजी जमिनीवर म्हणजेच कोस्टल रोडच्या स्वरुपात उभारण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाच्या दोन सुधारित आराखड्यांचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुरुवारी केले.
उत्तन विरार मार्ग आधी समुद्रातून उभारण्यात येणार होता. या सीलिंकसाठी 58 हजार कोटी रुपयांचा अर्थ अपेक्षित होता. मात्र आर्थिकदृष्ट्या हा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे आता हा मार्ग समुद्राला लागून नेण्याचा विचार पुढे आला असून त्यातून प्रकल्पाचा खर्च 38 हजार कोटी रुपयांपर्यंत खाली आला आहे.
प्रकल्पाचा सविस्तर अहवाल एमएमआरडीए तयार करणार आहे. मरीन ड्राइव्ह ते पालघर अशा 100 किमीहून अधिक लांबीच्या कोस्टल कॉरिडॉरची उभारणी करून मुंबईची थेट वाढवण बंदराला जोडणी दिली जाणार आहे. त्याचा भाग असलेला उत्तन ते विरार मार्ग आधी सी लिंक स्वरूपात उभारला जाणार होता. मात्र केंद्र सरकारकडून निधी मिळण्यात अडचणी येत होत्या. परिणामी हा कोस्टल रोड उभारण्यात येणार आहे.
प्रकल्पातील पहिल्या प्रस्तावात हा मार्ग समुद्राला लागून नेण्याचा विचार आहे. तसंच, हा मार्ग प्रत्येक दिशेच्या वाहतुकीसाठी तीन लेनचा उभारण्यात येणार आहे. त्यातून प्रकल्पाचा खर्च 38 हजार कोटी रुपये येणार आहे. तर, दुसऱ्या प्रस्तावात हा मार्ग प्रस्तावित डीपी रोडवरुन नेण्याचा विचार आहे. मात्र या डीपी रोडच्या भागात अतिक्रमणे असून ती काढणे अवघड ठरू शकते. तसंच, भूसंपादनाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.
उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पात दोन भुयारी मार्ग असणार आहेत. यात एक रहिवासी भागाजवळ असेल तर दुसरा भुयारी मार्ग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाखालून जाणार आहे. तसंच, वसई, विरार, उत्तन आदी रहिवासी भागात प्रवेश करण्यासाठी पाच इंटरचेंज प्रस्तावित आहेत.