'फोटोवरुन वाद, अश्लील कमेंट्स अन्..', कुर्ल्यात तरुण-तरुणीला मारहाणीनंतर प्रत्यक्षदर्शींनी सांगितला धक्कादायक घटनाक्रम
मुंबईच्या कुर्ल्यात फिनिक्स मॉलजवळील उद्यानात तरुण-तरुणीला मारहाण झाली. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शीने घटनाक्रम सांगितलाय. उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याचा दावा त्यांनी केलाय. आठ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मॉलजवळील उद्यानात एका तरुण आणि तरुणीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संताप व्यक्त केला जातोय. प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली आहे. यावेळी उद्यानातील सुरक्षेचा अभाव आणि तेथील परिस्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. उद्यानात सुरक्षारक्षकच नसल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
फोटो काढताना तरुण-तरुणीशी वाद
कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मॉलच्या मागे असलेल्या प्रमोद महाजन उद्यानात ही घटना घडली. उपलब्ध व्हिडीओनुसार, एक तरुण आणि तरुणी उद्यानात फोटो काढत होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही मुलांनी त्यांच्यावर अश्लील कमेंट केल्याचा आरोप आहे. या प्रकाराला दोघांनी विरोध केल्यानंतर वाद वाढला आणि संबंधित मुलांनी जोडप्याला मारहाण केल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक खुलासा
या उद्यानात स्वच्छतेचे काम करणाऱ्या सरनाबाई गजरे यांनी घटनेच्या वेळी तिथे साधारण 12 जण उपस्थित असल्याचे सांगितले. संबंधित टोळके जोडप्याला घाबरवण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी पैशांबाबतही काही बोलणे ऐकू आल्याचे त्यांनी सांगितले.
उद्यानात सुरक्षारक्षकच नसल्याचा दावा
सरनाबाई गजरे यांनी उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनाही उद्यानातून निघून जाण्यासाठी धमकावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक रहिवासी अशोक कांबळे यांनीही उद्यान सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. उद्यानात नशा करणारे लोक येत असल्याने स्थानिक नागरिक तिथे जाणे टाळतात, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे सार्वजनिक उद्यानांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतं?
व्हिडीओमध्ये काही मुलांनी जोडप्याला घेरल्याचे दिसते. तरुणाने विरोध केल्यानंतर त्याच्यावर चप्पलसदृश वस्तूने हल्ला करण्यात आल्याचे दृश्य आहे. एका मुलाने तरुणीच्या डोक्यावर काठीने वार केल्याचेही व्हिडीओमध्ये दिसते. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू होतो. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जातेय.
अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पीडित जोडप्याच्या तक्रारीनंतर घाटकोपर पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. भारतीय न्याय संहिता म्हणजेच बीएनएस कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून उद्यानातील सुरक्षेची व्यवस्था आणि अशा घटना रोखण्यासाठी संबंधित प्रशासन कोणती पावले उचलणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.