SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

फडणवीसांनी डिलीट केलेल्या पोस्टची महाराष्ट्रात चर्चा! स्क्रीनशॉट Viral; नेमकं काय लिहिलेलं त्यात? नागपुरचा निकाल फिरला अन्...

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट डिलीट केलं असलं तरी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले असून आता याच पोस्टवरुन फडणवीसांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली जात आहे. नेमकं यामध्ये होतं तरी काय? जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 29, 2026, 12:27 PM IST | Updated: Oct 29, 2026, 12:48 PM IST
Image Credit: नेमकं काय होतं मुख्यमंत्र्यांच्या पोस्टमध्ये? (प्रातिनिधिक फोटो)
Join

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशातील 28 जागांवर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना केलेली एक पोस्ट रात्री उशीरा लागलेल्या निकालांमुळे चर्चेत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी खोचकपणे काँग्रेस किती जागा जिंकली? असा सवाल केला होता. ही पोस्ट केली तेव्हा अनेक ठिकाणी मतमोजणी सुरु होती. असं असतानाच मोदींनी ही पोस्ट केली. मात्र रात्री नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल फिरला अन् काँग्रेसचा विजय झाला. त्यामुळेच या पोस्टवरुन आता विरोधकांकडून मोदींना लक्ष्य केलं जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही मोदींना लक्ष्य केलं आहे. एवढ्यावरच न थांबता नागपुरच्या होम ग्राऊंडवर काँग्रेसकडून पराभूत झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पोस्ट डिलिट करावी लागल्याबद्दलही राऊत बोललेत. नेमकं या होत या पोस्टमध्ये, मोदी काय म्हणाले होते? राऊतांनी काय म्हटलंय पाहूयात...

मोदी काय म्हणालेले?

मोदींनी बुधवारी सायंकाळी 5 वाजून 51 मिनिटांनी केलेल्या पोस्टमध्ये, "उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या 4 मोठ्या राज्यांमधील 28 जागांवर विधान परिषदेच्या निवडणुका. मतपत्रिका वापरून निवडणुका पार पडल्या. अंदाज लावा, काँग्रेसने किती जागा जिंकल्या?," अशी विचारणा करत काँग्रेसला डिवचलं होतं. पंतप्रधान मोदींनी या पोस्टमध्ये इमोजीही वापरला होता.

फडणवीसांनी कोणती पोस्ट करुन डिलीट केली?

मोदींनी केलेली हीच पोस्ट फडणवीसांनी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवत रिपोस्ट केलेली. मात्र त्यावेळी नागपूरमध्ये मतमोजणी सुरु होती. रात्री उशीरा नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी सलग दुस-यावेळी भाजपा उमेदवाराला पराभवाची धूळ चारली. त्यामुळेच फडणवीसांनी काही तासांपूर्वी शेअर केलेली मोदींची पोस्ट आणि त्यावरील आपली कमेंट डिलिट केली. या पोस्टमध्ये मोदींनी काँग्रेस शून्यावरच असल्याचं खोचकपणे इशारा करत सांगितलं होतं. त्यावर फडणवीसांनी, "भला मोठा भोपळा... कशातरी काँग्रेसने सातत्य टिकवून ठेवलं आहे," असं ही पोस्ट शेअर करताना म्हटलेलं. मात्र सांयकाळी साडेसातला केलेली ही पोस्ट फडणवीसांनी नंतर नागपुरमध्ये काँग्रेसचा विजय झाल्यानंतर डिलीट केली. पण या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झालाय.

राऊतांनी लगावला टोला...

फडणवीसांनी डिलिट केलेल्या ट्विटबद्दल राऊतांकडे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी, "मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या दुःखात वेदनेत सहभागी आहे. त्यांनी घाई घाईने ट्विट केलं. ते करायला नको. संयम पाहिजे होता. नरेंद्र मोदी यांनासुद्धा संयम पाहिजे होता. नरेंद्र मोदी यांना 28 जागांचे निकाल मिळाले त्यानंतर मोदी यांना हर्ष वायू झाला. हा अत्यंत वाईट आजार. आत्यानंद झालेला माणूस बेहोष होतो. स्वतःच्या विजयापेक्षा दुसऱ्याच्या पराभवामध्ये हर्षवायू होतो. तो अत्यंत वाईट असा हर्षवायू जर भाजपला झाला असेल तर त्यांनी आपल्या सर्व प्रमुख पदाधिकारी, पंतप्रधान यांच्यासह फुल बॉडी चेकअप करून हर्षवायूचं कारण समजून घेतलं पाहिजे. त्याला वात म्हणतात. वात आला त्यांना," अशी खोचक प्रतिक्रिया नोंदवली.

रोहित पवारांची खोचक पोस्ट

शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनीही फडणवीसांनी डिलिट केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत फडणवीसांना एक सल्ला दिला आहे. "आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घातलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात, ज्या ठिकाणी आपण स्वतः घरोघरी जाऊन बंडखोरांना माघार घेण्यासाठी मनवले, त्याच नागपूर मतदारसंघात, संघाचे मुख्यालय असलेल्या भागात भाजपला पराभव बघावा लागला, याचा अर्थ स्पष्ट आहे," असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. तसेच पुढे, "आपल्याला ट्विट डिलीट करावे लागले, याचे दुःख आहेच; पण आपल्या डिलीट झालेल्या ट्विटमध्ये दिसत असलेला सत्तेचा एवढा ईगो बरा नव्हे. असो, समजू शकतो. कदाचित निवडणूक बॅलेटवर झाली होती, याचा आपल्याला विसर पडला असावा, म्हणून आधीच ट्विट झाले असेल. विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांचे अभिनंदन, मतदानरूपी आशीर्वाद देणाऱ्या पदवीधरांचे आभार, लढणाऱ्या सर्व उमेदवारांनादेखील शुभेच्छा," असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

नागपुरात नेमका काय निकाल लागला?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या मैदानावर काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी 3 हजार 271 मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण 67 हजार 231 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली. रात्री 1 वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. म्हणजेच तब्बल  41 तासांपेक्षा जास्त तास ही मतमोजणी चालली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES