इन्स्टाग्रामवर रील पाहून ड्रेस ऑर्डर केला, पण 99 हजारांचा फटका बसला, नाशिकमधील 23 वर्षांच्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
ड्रेसच्या प्रक्रियेच्या नावाखाली उकळले पैसे. नाशिकच्या तरुणीला 99 हजारांचा गंडा घातला आहे.
सायबर क्राइमच्या घटना वाढल्या आहेत. सरकारकडून सायबर चोरांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना भुलवून कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नाशिकमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. ड्रेसची रिल पाहून ऑर्डर केला पण तरुणीला 99 हजारांचा फटका बसला आहे.
सोशल मीडियावर आकर्षक
कपड्यांची जाहिरात पाहून ऑनलाइन खरेदी करण्याच्या नादात सिडकोतील 23 वर्षीय विद्यार्थिनीला तब्बल 99 हजार 605 रुपयांचा गंडा घालण्यात आला. इन्स्टाग्रामवरील ड्रेसची रिल पाहून तरुणीने संबंधित विक्रेत्याशी संपर्क साधला. ड्रेसची ऑर्डर निश्चित करण्यापासून ते त्याच्या प्रक्रियेपर्यंत वेगवेगळ्या कारणांनी पैसे भरण्यास सांगत भामट्यांनी तिची फसवणूक केली
अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजरत्ननगर परिसरात राहणारी तनुजा चौरे (23) ही 3 जानेवारी रोजी दुपारी घरी असताना स्वक्तचे इन्स्टाग्राम अकाउंट स्क्रोल करीत होती. यावेळी एका इन्स्टाग्राम पेजवरील आकर्षक ड्रेसची रिल तिच्या नजरेस पडली. ड्रेस पसंत पडल्याने तिने त्याचा स्क्रीनशॉट घेत संबंधित पेजवर संदेश पाठवून ऑर्डर नोंदवली. यानंतर ऑनलाइन खरेदीची प्रक्रिया सुरू झाली.
ड्रेस पाठविण्याच्या नावाखाली तिला एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले. तेथून दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर आणि फोन-पे आयडीवर पैसे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. ड्रेसच्या प्रक्रियेचे कारण सांगत वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. तरुणीने विश्वास ठेवून वेगवेगळ्या खात्यांतर फोन-पेद्वारे एकूण 99 हजार 605 रुपये पाठवले. मात्र, ड्रेस मिळाला नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली. अंबड पोलिसांनी तीन अज्ञात मोबाईलधारक व संबंधित इन्स्टाग्राम आयडीविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.