पंढरपूर क्राईम : पंढरपूरमधील शिवा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ राजा भिंगे यांच्या हत्येचा उलगडा झाला आहे. हत्येचा बदला घेण्यासाठी भिंगे यांची हत्या करण्यात आल्याची पोलिसांनी माहिती दिली. याप्रकरणी पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातून शूटर बोलावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पंढरपूरमधील शिवा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ राजा भिंगे यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश आले आहे. या हत्येप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून, माजी नगरसेवक नामदेव भोईटे यांच्या 2017 मधील हत्येचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे.
या प्रकरणांमध्ये पुणे येथून नागे नावाचा शूटर बोलविण्यात आला होता. हा शूटर काही दिवस पंढरपूरमध्ये राहून त्याने भिंगे यांची रेकी केली होती. जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडण्याच्या वेळेची माहिती घेण्यात आली. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. हत्येनंतर अवघ्या 12 तासांत पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. दोघांना सुरुवातीला अटक करण्यात आली, तर उर्वरित तिघांना गुजरातमधील सोमनाथ येथून पकडण्यात आले. हत्येसाठी वापरलेले पिस्तूलही पोलिसांनी जप्त केले आहे.
शिवा संघटनेचे अध्यक्ष सराईत गुन्हेगार राजेंद्र उर्फ राजाभाऊ दत्तात्रय भिंगे यांच्या हत्येनंतर फरार झालेल्या तीन संशयितांना गुजरातमधील अहमदाबाद येथून ताब्यात घेण्यात घेतले होते. तर अन्य दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 2017 मध्ये मिरज येथे नगरसेवक नामदेव भोईटे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच भिंगे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासात या हत्येमागे नऊ वर्षांपूर्वीचा वाद असल्याची माहिती समोर येत आहे. नगरसेवक नामदेव भोईटे आणि राजाभाऊ भिंगे यांच्यात पूर्वी मैत्रीचे संबंध होते. मात्र, 2017 मध्ये मिरज येथे भोईटे यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात राजाभाऊ भिंगे यांना मुख्य सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली होती. या खटल्यातून त्यांची नंतर निर्दोष मुक्तता झाली होती. त्याच जुन्या प्रकरणाचा राग मनात धरून भिंगे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.
17 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास राजाभाऊ भिंगे हे जेवणानंतर इसबावी परिसरातील आपल्या घराजवळ शतपावली करत होते. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली असून, संभाव्य टोळीयुद्धाच्या भीतीने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. या प्रकरणात तात्या उर्फ प्रवीण देविदास शिंदे (रा. झेंडे गल्ली) याला 18 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर अनिकेत गवळी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
या हत्येतील मुख्य संशयित वैभव ज्ञानेश्वर फसलकर (रा. व्यासनारायण झोपडपट्टी, पंढरपूर), स्वप्नील अहिरे (रा. पंढरपूर) आणि रोहन नागे (रा. हडपसर) हे हत्येनंतर गुजरातमध्ये पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांची पथके गुजरातमध्ये रवाना झाली. अखेर अहमदाबाद येथून या तिघांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी या कारवाईची माहिती दिली. ताब्यात घेतलेल्या तिघांना अहमदाबाद न्यायालयात हजर करून कायदेशीर परवानगी घेतल्यानंतर पंढरपूरला आणण्यात येणार आहे. पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर आता या हत्येमागील नेमका कट, जुन्या वैमनस्याची पार्श्वभूमी आणि इतर सहभागी व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.