SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'डिलिमिटेशन'वरून शरद पवारांचा पक्ष तुटतोय; सलग दुसऱ्या दिवशी दुसरा राजीनामा, बड्या नेत्याने सोडली पवारांची साथ

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पक्षातील बड्या नेत्याने पवारांची साथ सोडली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 29, 2026, 12:07 IST | Updated: Nov 29, 2026, 12:13 IST
Image Credit: abhaysinh jagtap
Join

डिलिमिटेशनच्या बिलावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात वादळ आलं आहे. शरद पवार हे डिलिमिटेशनच्या बिलाला पाठिंबा देणार अशी चर्चा असताना पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. तिकडे सोनिया गांधीही मैदानात उतरल्या आहेत. त्या खुद्द शरद पवारांची भेट घेण्यासाठी मुंबईत येणार आहे. पण महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात एकामागोमाग राजीनामे पडत आहे. शनिवार (28 नोव्हेंबर) ला पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी राजीनाम्या दिला. त्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी पक्षातील बड्या नेत्याने पवारांची साथ सोडली आहे.

राष्ट्रवादी माण खटाव विधानसभा अध्यक्ष व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी आपल्या पदासोबतच पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिल्यामुळे पक्षात एकच खळबळ माजली आहे. अभयसिंह जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय.

हेसुद्धा वाचा -  'डिलिमिटेशन'वरून शरद पवारांच्या पक्षात 2 गट! कार्यकर्तेही सोडू लागले साथ, हे पाहा उदाहरण; विदर्भात तर वेगळाच धोका

 

 

अभयसिंह जगताप यांनी पत्रात काय लिहिलंय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार

अभयसिंह खाशेराव जगताप

दि. २८-११-२०२६

प्रति
मा. शशिकांत शिंदे साहेब,
प्रदेशाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प.)

विषय - पक्षाच्या सर्व पदांवरून, तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणेबाबत

महोदय,

मी गेली अनेक वर्षे पक्षाचे निष्ठेने काम केले. पक्षाचे विभाजन झाले तेव्हा सुद्धा मा. शरदचंद्र पवार साहेबांशी निष्ठा राखून पक्षाशी प्रामाणिक राहिलो. माढा लोकसभा मतदार संघात घराघरात पक्षाचे नवीन चिन्ह पोहोचवले. साहेबांच्या शब्दाखातर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत आपल्याकडे आवश्यक मतदान नसताना सुद्धा, पक्ष आदेशानुसार निवडणूक ताकतीने लढविली. विरोधकांनी अनेक प्रलोभने दाखविली असताना सुद्धा माघार घेतली नाही. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला सत्ताधाऱ्यांशी लढताना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. आर्थिक नुकसान होते. इतके सगळे होऊन सुद्धा कधी विचारांशी आणि निष्ठेशी तडजोड केली नाही.

सध्याची परिस्थिती पाहता पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी अनेक बाबतीत विचारांशी तडजोड केल्याचे जाणवते. मतदार संघ पुनर्रचना विधेयक म्हणजे फक्त खासदारांची संख्या वाढवणे आणि महिलांना ३३% आरक्षण देणे एवढेच नव्हे तर मतदारसंघांच्या परिसीमा नव्याने निश्चित करणे हे सुद्धा आहे. ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करताना सुद्धा भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष देऊन आपलीच ग्रामपंचायत कशी येईल अशा पद्धतीची वॉर्ड रचना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देतात. आता तर लोकसभा मतदार संघाची सीमा ठरवायची आहे, या सीमा ठरविताना अशा पद्धतीने ठरविल्या जातील कि त्याचा सरळ फायदा भाजपला होईल. या माध्यमातून विरोधक देशातून पूर्णपणे हद्दपार करण्याचा सत्ताधारी विचार करत असताना आपला पक्ष त्यास पाठिंबा देतो आहे हे पाहून मनाला वेदना होतात.

हा विषय फक्त मतदार संघ पुनर्रचना पुरता मर्यादित नाही. अनेक बाबतीत पक्षाची भूमिका संदिग्ध वाटते. त्यामुळे आम्ही सामान्य कार्यकर्ते अत्यंत हवालदिल झालो आहोत.

ज्या पक्षाशी इतकी वर्षे प्रामाणिक राहिलो त्या पक्षाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांची किंमत नाही असे वाटायला लागले आहे. आम्ही मतदार संघात बलाढ्य विरोधकांशी लढतो आहोत आणि त्यामुळे आम्हाला जो त्रास होतो आहे, त्याची जराही सुद्धा जाणीव न ठेवता, आपला पक्ष सरळ सरळ सत्ताधाऱ्यांशी हात मिळवणी करत असेल तर पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी लढायचे कशासाठी? आपली घरे जाळून, निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्याला मागे ठेवून, आपण आम्हाला त्रास देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असाल, तर आम्ही थांबलेले बरे.

आपला पक्ष भाजपशी हातमिळवणी करणार असेल तर मग कार्यकर्त्यांनी या पक्षाच्या मागे पळण्यापेक्षा सरळ भाजप मध्ये जाणेच योग्य नाही का? कशाला एवढी आदळ आपट करायची? आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी तरी उगीच भाजपाला का अंगावर घ्यायचे? सगळे जण स्वार्थ बघणार असतील तर निस्वार्थीपणे काम करणारा मूर्ख ठरतो. आम्ही तरी आमचे नुकसान का करून घ्यायचे? आणि जर विरोधच करायचा असेल तर जो पक्ष ठामपणे भाजपचा विरोध करेल त्याला पाठिंबा का देऊ नये? आमच्या कार्यकर्त्यांची अवस्था ना घरका ना घाट का, अशी झाली आहे. त्यामुळे आज काही तरी ठाम निर्णय घेणे आवश्यक झाले आहे. इतकी वर्षे मला साथ देणाऱ्या पक्षातील सर्वच वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो.

आदरणीय शरद पवार साहेबांवरील प्रेम कायम राहील परंतु पक्षाच्या निर्णयाशी सहमत नसल्यामुळे सध्या मी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच अध्यक्ष, माण - खटाव विधानसभा, या पदांवरून राजीनामा देत आहे. तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देत आहे.

आपलाच

अभयसिंह जगताप

(स्वाक्षरी)


Add Zee News as a Preferred Source

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES