SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवू नका,' जय पवारांचा युगेंद्र पवारांवर निशाणा, 'आम्ही शेवटपर्यंत वाट पाहिली, पण...'

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जय पवार यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या राजकीय वाटचालीबाबतही भूमिका स्पष्ट केली.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 09, 2026, 04:39 PM IST | Updated: Oct 09, 2026, 04:51 PM IST
Join

शेवटच्या दिवसापर्यंत मला वाटत होतं की आपण सगळे एकत्र बसून काहीतरी मार्ग काढू. पण जगतापांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दादांचं कुटुंब म्हणजे आपण सगळेच आहोत. मात्र, आम्हा सगळ्यांना जगतापांनी डावललं असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी केला आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जय पवार यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या राजकीय वाटचालीबाबतही भूमिका स्पष्ट केली.

“दादांचा अपघात झाला, त्यावेळी त्यांच्याजवळ जनतेच्या कामांचीच कागदपत्रं होती. शेवटच्या क्षणापर्यंत ते जनतेसाठीच काम करत होते. दादा गेल्यानंतर मी खूप विचार केला. राजकारण सोडावं, आईला वेळ द्यावा, असंही मनात आलं होतं. पण त्या 13 दिवसांत दादांवर जनतेचं किती प्रेम आहे, हे आम्ही जवळून पाहिलं. त्यानंतर ठरवलं की शेवटच्या क्षणापर्यंत जनतेसाठीच काम करायचं,” असं जय पवार म्हणाले.

“आपण दादांचे वारस आहोत. त्यांचं रक्त आपल्या शरीरात आहे. त्यामुळे जनतेसाठी जगायचं आणि दादांनी आयुष्यभर जपलेला जनसेवेचा विचार पुढे न्यायचा, हा आमचा निर्धार आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'एकत्र येण्याची चर्चाही झाली होती'

काही दिवसांपूर्वी सुप्रिया आत्यांच्या घरी बहिण रेवतीला भेटण्यासाठी गेलो असता सोमेश्वर कारखाना निवडणुकीबाबत एकत्र येण्याची चर्चा झाली होती, अशी माहिती जय पवार यांनी दिली. “युगेंद्र पवार यांनीच सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का, अशी भूमिका मांडली होती. त्यावेळी पार्थदादांनी स्पष्ट सांगितलं की, ‘युगेंद्र, आमचे कार्यकर्ते आम्हाला असं करू नका, असं सांगत आहेत. हे कार्यकर्ते आमच्यासाठी झटतात, त्यामुळे आम्हाला त्यांचं ऐकावं लागतं.’ त्यानंतरही आम्ही शेवटपर्यंत काहीतरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा ठेवली होती,” असं जय पवार यांनी सांगितलं.


माळेगाव कारखाना 70 कोटींच्या तोट्यात असल्याचा दावा; जय पवारांचा पलटवार

माळेगाव कारखान्याच्या आर्थिक स्थितीवरून युगेंद्र पवार यांनी केलेल्या आरोपांवरही जय पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “दादा गेल्यानंतर माळेगाव कारखान्याचं 70  कोटी रुपयांचं नुकसान झालं, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं. त्यानंतर मी या विषयाची माहिती घेतली. मात्र, कारखाना दोन कोटी रुपयांच्या नफ्यात असल्याची माहिती माझ्यासमोर आली,” असेही जय पवार यांनी स्पष्ट केले.

“निवडणूक लढवायची असेल तर जरूर लढवा; पण वस्तुस्थितीच्या आधारावर लढा. उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करू नका. सभासद आणि शेतकरी सुज्ञ आहेत. त्यांना काय खरं आणि काय खोटं, हे चांगलं कळतं. त्यामुळे सत्य फार काळ लपवता येणार नाही,” असा इशारा जय पवार यांनी दिला.

‘सभासदांचं हित हाच मुख्य मुद्दा’

सोमेश्वर कारखाना हा सभासद आणि शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला कारखाना आहे. त्यामुळे निवडणुकीत वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सभासदांचं हित, शेतकऱ्यांचा फायदा आणि कारखान्याचा विकास हेच महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत, अशी भूमिका जय पवार यांनी मांडली. “ही निवडणूक कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. कारखाना आणि सभासदांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचा आहे. शेवटी निर्णय सभासदच घेतील,” असं जय पवार यांनी नमूद केलं.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES