सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील निकालानंतर राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. सांगलीच्या बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी दोघांच्याही समर्थकांनी घोषणाबाजी करत काही काळ गोंधळ घातला. तसंच दोन्ही नेत्यांनीही आपल्या भाषणातून एकमेकांवर अप्रत्यक्ष टीका केली. यादरम्यान जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांच्या भाषणातील एक चूक सुधारत पुढच्या वेळी चांगला अभ्यास करा असा टोला लगावला,
गोपीचंद पडळकर यांनी भाषणावेळी सांगितलं की, अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळागडाच्या पायथ्याशी काढला. तसंच शत्रू कितीही मोठा असला तरी घाबरायचं नाही असं सांगत जयंत पाटलांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यानंतर जयंत पाटलांनी पडळकरांच्या इतिहासावरून खोचक टोला लगावला आहे, अफजलखानाचा कोथळा पन्हाळगडाच्या नव्हे, तर प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला, असं सांगताना त्यांनी पुढच्या वेळी जरा चांगला अभ्यास करून या असा टोला लगावला. ते म्हणाले की, "पुढच्या वेळी जरा चांगला अभ्यास करुन या. पाठ केलेले भाषण केले की असे होते".
यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांना आपली संस्कृती कधी सोडायची नाही असा सल्लाही दिला. "कायम एक लक्षात ठेवायचं. कधी चिडायचं नसतं आणि आपली संस्कृती कधी सोडायची नसते. कोणाला काहीही करायचं असलं तरी आपली संस्कृती ही आहे की, आलेल्या माणसाची सन्मानाने परत जाण्याची व्यवस्था करायची", असं ते म्हणाले.
गोपीचंद पडळकर यांची कार्यक्रमस्थळी एंट्री होताच गोंधळ उडाला, जयंत पाटील व गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जयंत पाटील व्यासपीठावर असतानाच गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आल्याने गोंधळ उडाला.
दरम्यान गोंधळानंतर जयंत पाटलांनी आपल्या समर्थकांना शांततेचं आवाहन केल्यानंतर घोषणाबाजी थांबली. आपण सुसंस्कृतपणानं वागायचं असतं, आपल्या दारात कोणी आलं तर त्याचा सन्मान करायचा असतो असं जयंत पाटील यांनी समर्थकांना सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी आयोजकांना व्यासपीठावर गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करायला लावत, दोन्ही बाजूने सुरू असलेली घोषणाबाजी थांबवली.