अजित पवारांच्या पुतळा अनावरणाला राष्ट्रवादीचे 3 दिग्गज गैरहजर; भरत गोगावलेंचा टोला, म्हणाले, 'दादांमुळेच मंत्री झाले अन्…'
पुण्यात अजित पवारांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे गैरहजर. भरत गोगावलेंनी नेमका काय टोला लगावला? जाणून घेऊया.
पुण्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे हे प्रमुख नेते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अनुपस्थित नेत्यांना लक्ष्य करत सूचक विधान केले. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काय म्हणाले भरत गोगावले? महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरुय चर्चा? सविस्तर जाणून घेऊया.
पुण्यात अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण
पुणे जिल्हा परिषद परिसरात दिवंगत अजित पवार यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीतील अनेक नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांची अनुपस्थिती
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित नव्हते. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनीच सोहळ्याला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षातील अन्य नेतेही या कार्यक्रमाला अनुपस्थित होते, असेही वृत्त समोर येतंय.
भरत गोगावलेंनी नेमकं काय म्हटलं?
या अनुपस्थितीवर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी गोगावलेंनी एनसीपीच्या ज्येष्ठ नेत्यांना टोला लगावला. 'अनुपस्थित नेत्यांच्या मनात काय शिजतंय, ते त्यांनाच विचारा,' असे ते म्हणाले. तसेच 'अजितदादांमुळेच ही सर्व मंडळी मंत्रिपदापर्यंत पोहोचली,' असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्या राजकीय योगदानाची आठवण करून दिली. गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखी राजकीय धार मिळाली आहे.
निमंत्रण नव्हते की विश्वासात घेतले नाही?
अनुपस्थित नेत्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते का?, त्यांना योग्य प्रकारे विश्वासात घेतले होते काय़, याची चौकशी व्हायला हवी, असेही गोगावले यांनी सूचित केले. त्यामुळे या नेत्यांची अनुपस्थिती ही केवळ वैयक्तिक कारणांमुळे होती की पक्षांतर्गत काही नाराजी आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय.
राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोर धरत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील महत्वाच्या कार्यक्रमात अमित शाह उपस्थित असताना एनसीपीतील ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती अनेक राजकीय अर्थ काढण्यास वाव देणारी ठरलीय.