SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'जर कोणी कारवाई थांबवायला फोन केला तर नाव जाहीर करणार,' अतीक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पुणे आयुक्तांचा इशारा; रोज धडाडणार JCB

फर्ग्युसन कॉलेज (FC) रस्त्यावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर भाजप नगरसेवकांनी आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 20, 2026, 16:48 IST | Updated: Nov 20, 2026, 17:01 IST
Image Credit: पुण्यात अतीक्रमणविरोधी कारवाई तीव्र, रोज चालणार JCB
Join

पुणे शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, महापालिका प्रशासनाने अतिक्रमणविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. फर्ग्युसन कॉलेज (FC) रस्त्यावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर भाजप नगरसेवकांनी आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता (JM रोड) यांसह शहरातील विविध भागांत अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. आता ही मोहीम डिसेंबर महिन्यातही सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.

डिसेंबरपर्यंत संपूर्ण पुणे शहरात महापालिकेचे जेसीबी दिसतील आणि या कारवाईत एकही दिवस खंड पडणार नाही, असा निर्धार आयुक्तांनी व्यक्त केला आहे. अतिक्रमण कोणाचेही असले, तरी ते हटवले जाईल. कारवाई थांबवण्यासाठी कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली आहे.

पुणे शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाई केवळ काही प्रमुख रस्त्यांपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण शहरात राबवण्यात येणार आहे. शहरातील जवळपास प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमणाची समस्या असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून सातत्याने कारवाई केली जाणार आहे.या मोहिमेत एकही दिवस खंड पडणार नसल्याचे सांगत, प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याचा ठाम निर्धार केला आहे. पुढील दोन महिन्यांत संपूर्ण अतिक्रमण हटवता येईल की नाही, याबाबत निश्चित सांगता येणार नसले, तरी कारवाई दररोज सुरू राहील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

आयुक्त म्हणाले, पुण्यात जवळपास अडीच लाख दुकाने फ्रंट मार्जिनच्या जागेवर थाटण्यात आली आहेत. फुटपाथवरील दुकानांवर कारवाई केल्यानंतर काही काळ परिस्थिती सुधारते; मात्र ही कारवाई अनेकदा तात्पुरती ठरते. त्यामुळे आता केवळ फुटपाथवरील अतिक्रमण हटवून चालणार नाही, तर फ्रंट मार्जिनवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. फ्रंट मार्जिनच्या जागेवर एक इंचही अनधिकृत बांधकाम सहन केले जाणार नाही, असा ठाम इशारा आयुक्तांनी दिला आहे.

अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान अनेकदा राजकीय दबाव किंवा फोनद्वारे कारवाई थांबवण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अतिक्रमण कोणाचेही असो, ते हटवले जाईल. कारवाईदरम्यान कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयाचे जे काही परिणाम होतील, त्यांना सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. इतकेच नाही, तर अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवण्यासाठी कोणी फोन केला, तर संबंधित व्यक्तीचे नाव आणि फोन नंबर जाहीर करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा भाजप नगरसेवकांनी आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने FC रोड आणि JM रोडसह विविध भागांत कारवाई सुरू केली. मात्र, आता ही मोहीम केवळ काही दिवसांची किंवा ठरावीक रस्त्यांपुरती राहणार नसल्याचे आयुक्तांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. फुटपाथवरील अतिक्रमण, दुकानांसमोरील अनधिकृत बांधकामे आणि फ्रंट मार्जिनवरील कब्जा हटवण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी, दुकानदार आणि अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES