महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील प्रितीसंगमावर त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अभिवादन केलं. यावेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया यांना दोन्ही राष्ट्रवादींचं प्रितीसंगम होणार का? असा सवाल विचारण्यात आला. तसेच शरद पवार हे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पार्टीसोबत वाटाघाटी करत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवरही सुप्रिया यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादींचं प्रितीसंगम होणार?
दोन्ही राष्ट्रवादींचं प्रितीसंगम होणार का? या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी, "तुम्ही चॅनेल पाहता ना? या प्रश्नावर मी आधीच बोलले आहे," म्हणत हात जोडून, "रामकृष्ण हरी" असं उत्तर दिलं. शरद पवारांचा पक्ष भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याचे प्रयत्न सुरु असल्याच्या तसेच त्यांना केंद्रीय मंत्री बनवलं जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यासंदर्भातील प्रश्नावरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे.
तुम्ही मुख्यमंत्री होणार अशी चर्चा, यावर काय बोलल्या?
"तुम्ही केंद्रीय मंत्री होणार अशी चर्चा होती आता मुख्यमंत्री होणार अशी चर्चा आहे," असं म्हणत एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी यावर खोचक उत्तर दिलं. "एकतर गेली 12 वर्ष माझा शपथविधी होत आहे. माझ्यावर अन्याय करु नका. 2014 पासून मी मंत्री होतेय," असं सुप्रिया सुळे म्हणताच पत्रकारांमध्ये हशा पिकला. पुढे बोलताना, "मला या कुठल्याच कथांमध्ये रस नाही. दु:ख एकाच गोष्टीचं वाटतं, ज्या पॉलिसी मेकिंगसाठी मी निवडून गेले आहे त्याबद्दल गांभीर्याने कोणीच मला विचारत नाही. मी चार जॉइंट पार्लामेंट्री कमिटींवर आहे. देशाच्या फायनान्स कमिटीवर आहे. याचं दु:ख कायम वाटतं की बारामती मतदारसंघाने इतक्या विश्वासाने मला पाठवलं. मी महाराष्ट्राच्यावतीने जाते. देशाच्या फायनान्स कमिटीवर, चार पार्लामेंट्री कमिटीवर मी आहे. हे माझं भाग्य, तुमच्यासारख्या लोकांनी केलेल्या प्रेमाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या संधीमुळे शक्य झालं आहे. त्यामुळे मला राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळतेय. त्याबद्दल मला एखादा जरी प्रश्न विचारला ना तर मला अंतकरणातून आनंद होईल," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
गोकुळ सुनावणीमध्ये आम्ही बंटीदादांसोबत
गोकुळ प्रकरणामध्ये आज न्यायालयामध्ये सुनावणी होणार असून यासंदर्भात विचारलं असता सुप्रिया सुळेंनी, "मी बंटीदादांच्या मागे आहे. मला असं म्हणावं लागतं की सहकार चळवळ अनेक मोठ्या नेत्यांनी जिवंत ठेवली. एखादं मत कमी जास्त झालं तर सरकारने समांजस्य दाखवून चर्चेतून मार्ग काढला असता तर बरं झालं असतं. माझी सरकारला विनम्र विनंती आहे. मी हात जोडून विनंती करते की गोकूळचा प्रश्न सोडवा. देशाची सेवा, देशासमोर जे आव्हान आहे त्याकडे लक्ष द्यावं," असं आवाहन केलं.
दुष्काळात एकत्र काम करण्याची गरज
पहलगामच्या वेळी सर्व विरोधी पक्षांनी देशासाठी आवाज उठवला आणि सरकारचं समर्थन दिलं, अशी आठवण सुप्रिया सुळेंनी करुन दिलं. तेव्हा देशावर हल्ला झाला होता आणि दुष्काळाच्या माध्यमातून राज्यावर संकट ओढावल्याने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं सुप्रिया यांनी म्हटलंय. दुष्काळाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आमच्या पक्षाचे अनेक नेते दुष्काळासंदर्भात फॉलोअप घेत आहेत. जनतेची सेवा करुन त्यांना न्याय देण्याची वेळ आहे, असं सुप्रिया यांनी म्हटलंय.