पुण्यातील गँगस्टर पिस्तुले कुठून खरेदी करतात? गुंडाच्या टोळीत पोरं कशी भरती करतात? UP, बिहारपेक्षा डेंजर स्टोरी
पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार झाल्याने खळबळ माजली आहे. पुण्यात अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. यांच्याकडे पिस्तुले कुठून येतात तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Pune Crime News : पुण्यात खुलेआम गोळीबार, कोयत्याने वार, चाकू हल्ला अशा घटना घडत आहेत. पुण्यात गुंडाच्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. पुण्यात न्यायालयाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पुण्याक दहशत माजवणारे गँगस्टर पिस्तुले कुठून खरेदी करतात? गुंडाच्या टोळीत पोरं कशी भरती करतात? संपूर्ण तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आंदेकर टोळी अन गँगवार
कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा १ सप्टेंबर २०२४ रोजी टोळीने गोळ्या झाडून खून केला होता. त्यामध्ये सोमनाथ गायकवाड, जावई गणेश कोमकर टोळीचा हात होता.
खूनाचा बदला अन गँगवार
मुलाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी कुख्यात बंडू आंदेकर याने स्वतःचा जावई गणेश कोमकर याचा मुलगा आयुश कोमकर याच्यावर गोळीबार घडवून खून केल्याची घटना 5 सप्टेंबर 2025 रोजी नाना पेठेत घडली. त्यानंतर गायकवाड आणि आंदेकर टोळीयुद्ध पुन्हा सुरू झाले.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याच्या भावावर पिस्तूलातून गोळ्या झाडून भरदिवसा खून केल्याची घटना शनिवारी 1 नोव्हेंबरला दुपारी कोंढवा भागात घडली. गणेश किसन काळे (वय 32, रा. येवलेवाडी, कोढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. काळे हा रिक्षाचालक होता, त्याच्याविरूद्ध एक गुन्हाही दाखल होता. वनराज आंदेकर खून प्रकरणात समीर काळेने इतर आरोपींना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिली होती.
याप्रकरणी समीर काळे, आबा खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांना अटक झाली होती. त्याच रागातून आंदेकर टोळीने १ नोव्हेंबरला दोन दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी गणेश काळेवरपिस्तुलातून गोळीबार केला. त्याच्यावर कोयत्याने वार करीत खून केला.
टोळीयुद्धामुळे मागील दोन महिन्यांपासून नाना पेठ, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा सातत्याने चर्चेत आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीविरूद्ध आतापर्यंत विविध स्वरूपाचे 13 गुन्हे दाखल केले आहेत.
कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीची दहशत
गाडीला रस्ता न दिल्याच्या रागातून कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीने तरूणावर गोळीबार करीत त्याला गंभीररित्या जखमी केले. ही घटना १७ सप्टेंबरला कोथरूडमध्ये घडली होती. त्यानंतर पोलिसांनी टोळीविरूद्ध मोक्का कारवाई केली होती.
गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक केली असून, मुख्य आरोपी नीलेश घायवळ परदेशात पसार झाला आहे. बनावट कागदपत्राद्वारे पासपोर्ट बनविणे, खंडणी उकळणे, दहशत निर्माण करणे यासह मागील महिन्याभरात घायवळविरूद्ध पुणे पोलिसांनी 10 गुन्हे दाखल केले आहेत.
कुख्यात गजा मारणे टोळीचीही पुण्यात दहशत
आयटी अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गजानन मारणे टोळीविरूद्ध मोक्का कारवाई केली आहे. कोथरूड परिसरात कुख्यात गजानन मारणे टोळीतील गुंडांनी आय टी अभियंत्याला बेदम मारहाण केल्याची घटना 19 फेब्रुवारी 2026 रोजी घडली होती. कोथरूड पोलिसांनी मारणे टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे. ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू ( वय ३५), किरण कोंडिबा पडवळ ( वय ३१) अमोल विनायक तापकीर ( वय ३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौथा आरोपी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार पसार झाला आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. देवेंद्र पुरुषोत्तम जोग ( वय ३३, रा. मयूर कॉलनी, कोथरूड ) यांनी फिर्याद नोंदवली आहे. 24 फेबु्रवारीला गजा मारणे पोलिसांसमोर हजर झाला होता.
कुख्यात टिपू पठाण टोळी
हडपसर परिसरात दहशत माजविणार्या कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपु सत्तार पठाण याच्याविरूद्ध पुणे पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरूद्ध खंडणी उकळणे, ताबा मारणे, गोळीबार करणे, अपहरण करण्यासह इतर विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण ( रा. सय्यदनगर, हडपसर) सराईत असून, त्याच्याविरूद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यातंर्गत विविध गुन्हे आहेत. हडपसरमधील सय्यदनगर भागात पठाणने बेकायदेशीपणे ऑफीस, टपरी व इतर अनाधिकृत अतिक्रमण केले होते. काळेपडळ पोलीसांनी माहिती प्राप्त करुन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला पत्र पाठविले होते. त्यापार्श्वभूमीवर २६ सप्टेंबरला काळेपडळ पोलीस, अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करीत अतिक्रमण उध्वस्त केले आहे.
कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा वनराजच्या खूनानंतर पुण्यात गँगवार भडकले असून, दिवसाढवळ्या गोळीबार, कोयत्याच्या वाराने सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
गुंड गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर, वनराजच्या हत्येतील आरोपीचा भाउ गणेश काळे, मयंक खरारे या अल्पवयीनाचा अत्यंत वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावर कोयत्याने हल्ला करीत खून केला. घातक कोयत्यांच्या विक्रीला बंदी असतानाही बिनधिक्कपणे विकले जाणारे कोयते, अल्पवयीनांमध्ये सुरू असलेल्या भाईगिरीची क्रेझ थेट खूनापर्यंत येउन पोहोचली आहे. त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारीबद्दल खडानखडा माहिती असणारे अधिकारी सक्रिय असूनही उपयोग काय असा प्रश्न निर्माण केला जात आहे. पोलीस दलातील शिथिलतेमुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे का, पोलीस यंत्रणा बोथट झाल्याने कोयत्याचा वापर गुन्हेगारीसाठी होऊ लागला का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. कोयताधारींच्या धुडगूसामुळे पुणे पोलिसांच्या कामगिरीला लागणारा बट्टा पुसून काढण्यासाठी ठोस अमलबजावणीची आवश्यकता आहे. त्यासाठी शस्त्रधारीविरूद्ध फैसला ऑन दि स्पॉट अशीच तयारीही पोलिसांना करावी लागणार आहे.
टोळीयुद्धात मध्यप्रदेशातील पिस्तूलांचा होतोय वापर
अतिशय कमी दरात गावठी पिस्तूलांचा वापर होत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. सर्व पिस्तुले मध्य-प्रदेशातून खरेदी केली जात आहेत. 10 हजारांपासून ते 75 हजारांपर्यंत किंमतीची पिस्तूले खरेदी करीत गोळीबार केला जात आहे. प्रामुख्याने निमर्नुष्य ठिकाणांसह, जंगलात गोळीबाराचा सराव करीत आरोपी आपल्या दुश्मनांचा खात्मा करीत आहेत.
आंदेकर टोळीकडून केला जातोय अल्पवयीनांचा सहभाग
गँगवारामध्ये आंदेकर टोळीकडून सर्रासपणे अल्पवयीन आरोपींचा सहभाग करवून घेतला जात आहे. पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरही त्यांना लगेच जामीन मिळण्यास मदत होते. आरोपींना मारहाण होत नसल्यामुळे टोळीची नावे फुटण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश केला जात आहे.
चौकट-कोयताधारींचा असाही ट्रेंड
पुण्यात मागील काही दिवसांत बहुतांश झालेले खून कोयत्याच्या हल्ल्याने केले आहेत. जेणेकरून टोळीची दहशत, दादागिरी निर्माण करण्यासाठी हल्लेखोर कोयत्याचा वापर करीत असल्याचे बोलले जाते. त्यासोबतच सोशल मीडियावर शस्त्रअस्त्राद्वारे आपली ताकद दाखवण्यासाठीही कोयताधारींचा ट्रेंड निर्माण होत आहे. प्रामुख्याने अल्पवयीन मुलांसह नुकतीच मिसरूड फुटलेली पोरंही आता अशा ट्रेंडकडे झुकत आहेत. पालकांचे दुर्लक्ष, संगती, प्रलोभन, आर्कषणापोटी अनेकजण गुन्हेगारीकडे अल्पवयातच वळत आहेत. त्यावर उपाय शोधून वेळीच आवर घालणे काळची गरज आहे. अन्यथा सोशल मीडियाच्या जमान्यात व्हायरलप्रमाणे गुन्हेगारीलाही धार चढण्यास वेळ लागणार नाही.