राष्ट्रवादीत 2 गट? आव्हाडांची सुळेंविरोधात थेट भूमिका? अमित शाहांचं नाव घेत सुळेंकडून सरकार समर्थनाची तयारी; आव्हाड म्हटले, 'त्यांनी दिला ना पाठिंबा? आम्ही तर...'
सुप्रिया सुळे यांनी शनिवारपासून डिलिमीटेशनसंदर्भातील विधेयकाबद्दल बोलताना सरकार समर्थक भूमिका मांडल्याचं दिसून आलं आहे. यासंदर्भात विचारलं असता आव्हाड यांनी नेमकं काय उत्तर दिलं जाणून घ्या...
डिलिमीटेशनच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यामुळे पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सुप्रिया सुळेंविरुद्ध भूमिका घेतल्याचं त्यांनी पत्रकारांना दिलेल्या उत्तरातून दिसून येत आहे. डिलिमीटेशनच्या मुद्द्यावरुन शरद पवारांच्या पक्षात नाराजी असल्याची चर्चा असतानाच आव्हाड यांनी रोखठोकपणे आपली भूमिका मांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, अमित शहा, किरण रिजिजू यांच्याशी चर्चा झाली
सुप्रिया सुळेंनी डिलमीटेशनच्या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका नोंदवताना सरकारच्या बाजूने मत मांडलं आहे. "शरद पवारांचा पक्ष पहिल्या दिवसापासून सातत्याने सांगत आहे महिला आरक्षणाचा आमचा आग्रह आहे 50 टक्क्याची अट ठेवली आहे. आमची याबाबत अमित शहा, किरण रिजिजू यांच्याशी चर्चा सुद्धा झाली आहे. आमच्या तीन मागण्या आहेत. जेव्हा डीलिमिटेशन होईल त्यावेळी महिलांचे आरक्षण करा, मतदारसंघ 30 ते 40 लाखांचा झाला आहे किती ही सुपरमॅन, बॅटमॅन असेल विकासकामांचा निधी 5 कोटींचा येतो ते अशक्य आहे. काश्मीर ते कन्याकुमारी 50 ने जागा वाढणार आहेत. मागच्या वेळेस पण आम्ही मागणी केली होती की लिहून द्या पण पूर्ण बिल मी वाचलेले नाही. सहकार्याची भूमिका आम्ही दाखवली तर एक फॉर्म्युला सगळ्या राज्यांना असायला हवा आणि महिला आरक्षणाच बिल झालंच पाहिजे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आम्हाला ज्या रूपात विधेयक येईल असे...
'राज्यांतील लोकसभा मतदारसंघांची संख्या 50 टक्क्यांनी वाढत असेल आणि त्याला महिला आरक्षणाची जोड असेल तर देशहितासाठी आम्ही त्याचा सकारात्मक विचार करू शकतो', अशी भूमिका सुळे यांनी शनिवारीही मांडली होती. परंतु, 'आम्हाला ज्या रूपात विधेयक येईल असे आश्वासन दिले होते, तसे अद्याप आलेले नाही', असेही त्यांनी नमूद केले. केंद्रात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुळे मागील काही दिवसांपासून पुन्हा सातत्याने या विषयावर पक्षाची भूमिका मांडत आहेत. 'केंद्र सरकारने एका बैठकीत आम्हाला बोलावून प्रस्ताव दिला होता की, मतदारसंघ पुनर्रचनेच्या अनुषंगाने प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढतील. तसे असेल, तर आम्ही सगळेच गांभीर्याने विचार करू, अशी भूमिका आम्ही मांडली', असे त्या म्हणाल्या.
नक्की वाचा >>
पवारांना धक्का? आव्हाडांच्या 3 शब्दाच्या व्हॉट्सअप स्टेटसनं एकच खळबळ; नंतर स्टेटस डिलिट करून म्हणाले, 'मी सत्ता...'
इंडिया आघाडीच्या भूमिकेवर काय म्हणाल्या?
इंडिया आघाडीची डीलिमिटेशनची भूमिका वेगवेगळी असल्यासंदर्भात विचारलं असताना, "अनेक वेळा असं झालं आहे की एक मत नाही. पहलगाम वेळेस पवार साहेब पहिले होते ज्यांनी सरकारला पाठिंबा दिला होता नंतर काँग्रेस ने सुद्धा पाठिंबा दिला," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आव्हाड काय म्हणाले?
सुप्रिया सुळे यांनी डिलिमीटेशनसंदर्भात नोंदवलेल्या मतासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक उत्तर दिलं. "त्यांनी दिला आहे ना पाठिंबा? आम्ही आहोत का त्यात? पवार साहेब सध्या बोलत नाहीत. सुप्रिया ताई बोलत आहेत. मी काय खासदार नाही, वरचे निर्णय ते घेणार," असं आव्हाड म्हणाले.
नताशा आव्हाडांच्या विरोधावरही सुप्रिया बोलल्या
जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांनी डिलिमीटेशवरून पक्षाने सरकारला पाठिंबा दिला तर आपला त्याला विरोध असेल असं सोशल मीडियावरुन स्पष्ट केल्यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांनी, "नवीन पिढीत या गोष्टी असू शकतात. पिढी बदलत आहे प्रत्येक घरात काय असतं ते त्यांच्या घरात ठरवले जाते. मी माझ्या घरातल्यांच्या बाहेर नाही," असं उत्तर दिलं.