50% व्याजदर, ₹50000 च्या कर्जासाठी ₹300000+ दिले तरी...; कोकणी महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विळख्यात
दुष्काळामध्ये बळजबरीने केली जाणाऱ्या कर्जवसुलीमुळे मायक्रो फायनान्स कंपन्या चर्चेत असतानाच या कंपन्यांचा कोणकणातील प्रभाव आणि त्यांच्या विळख्यात महिला कशा अडकल्याची याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रामध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांकडून केली जाणारी वसुली चर्चेचा मुद्दा ठरत आहे. अशातच आता अल्प उत्पन्न गटातील महिलांची संख्या चिंतेत भर घालणारी आहे. मायक्रो फायनान्स कंपन्याचं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात परलेलं जाळं, त्यांनी तब्बल 50 टक्क्यांनी दिलेले कर्ज या साऱ्यामुळे आवळत असलेला व्याजाच्या फासामध्ये महिला अडकत असल्याचं दिसत आहे. कोकणामध्ये अनेक ठिकाणी या अशा महिला आहेत. प्रमुख्याने चिपळून, खेड, दापोली, संगमेश्वर, रत्नागिरीमध्ये या अशा महिलांची संख्या प्रचंड मोठी आहे. अवघ्या 50 ते 60 हजारांच्या कर्जासाठी अनेक महिलांनी तब्बल 3 लाखांपर्यंत रक्कम फेडल्याचे दावेही केला जातात.
50 टक्क्यांपर्यंत व्याज
अनेकदा या कंपन्यांची कर्ज फेडण्यासाठी महिलांना कर्ज घ्यावी लागतात ती स्थानिक सावकाराकडून! कर्ज, व्याज, नवीन कर्ज, वाढीव व्याज अशा गर्तेत या महिला अडकलेल्या आहेत. अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांचे वार्षिक व्याज दर 50 टक्क्यांपर्यंत पोहोचत असल्याने या महिला कर्जाच्या महाभयंकर चक्रव्यूहात अडकल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील कर्जबाजारी महिलांची संख्या तीन हजारांच्या पुढे आहे.
कर्ज देण्याची विचित्र पद्धत
बरं ही कर्ज देण्याची पद्धतही अत्यंच विचित्र आणि कर्जदाराचं शोषण करणारी आहे. ही कर्ज फेडण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी असतो. 50 हजारांच्या कर्ज मंजूर केल्यावर त्यातील 10 टक्के रक्कम ही विम्यासह विविध कारणांसाठी सुरुवातीलाच कापून घेतली जाते. मग, 45 हजारांसाठी 24 टक्क्यांपासून 50 टक्के इतके व्याज आकारले जाते. सरासरी या कर्जासाठी महिन्याला 2500 रु. एवढा हप्ता ठरतो. सुरुवातीचे दोन ते तीन हप्ते भरल्यानंतर आपण हे कर्ज फेडू शकतो, असे महिलांना वाटू लागते. तेव्हाच इतर कंपन्यांचे एजंट नवीन कर्जे देण्याचा सपाटा लावतात आणि गरजेपोटी त्या मोहास बळी पडतात. त्यानंतर कर्जवसुलीचा तगादा सुरू होत असल्याचा अनुभव अनेक महिलांना आला आहे.
नियमांचं उल्लंघन
2020 मध्ये रिझव्ह बँकेने मायक्रो फायनान्स कंपन्यांना 24 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारण्याची मुभा दिली. परंतु, या कंपन्या त्याहून अधिक व्याजदर आकारत असल्याचा आरोप केला जातो. या कंपन्यांकडून कर्जवसुली 19 टक्क्यांपर्यंत गेल्याचे सांगण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे एका व्यक्तीस कमाल तीन कंपन्याच कर्ज देऊ शकतील, अशी तरतूद असताना आठ ते दहा कंपन्यांनी कर्जपुरवठा केल्याचे समोर आले आहे. कोकणातलं हे भयान वास्तव सध्या मायक्रो फायनान्स कंपन्या दुष्काळातील सक्तीच्या कर्जवसुलीमुळे चर्चेत असतानाच समोर आलं आहे.