फक्त रट्टा मारणाऱ्यांना नाही मिळणार गुण; 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचा नवा नियम
सीबीएसई बोर्ड परीक्षा 2027 मध्ये दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना विषयाची समज आणि तार्किक विचारांना महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदलला का आणि विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी? याबद्दल जाणून घेऊया.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच सीबीएसई 2027 च्या बोर्ड परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन पद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. केवळ पाठ्यपुस्तकातील उत्तरे जशीच्या तशी लिहिण्यापेक्षा विषय समजून घेऊन स्वतःच्या शब्दांत उत्तर मांडण्यावर भर दिला जाणार आहे. हा बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच एनईपी 2020 कौशल्याधारित शिक्षणाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर नेमका काय परिणाम होऊ शकतो, ते समजून घेऊया.
पाठांतरापेक्षा विषयाची समज महत्त्वाची
आगामी परीक्षांमध्ये उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांना विषय किती समजला आहे, याकडे लक्ष दिले जाणार आहे. एखाद्या संकल्पनेची व्याख्या पाठ असणे पुरेसे ठरणार नाही. ती संकल्पना समजावून सांगता येते का, तिचा योग्य संदर्भात वापर करता येतो का, यालाही महत्त्व मिळू शकते. त्यामुळे केवळ प्रश्नोत्तरे पाठ करण्याऐवजी प्रत्येक धड्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक ठरणार आहे.
तार्किक विचार आणि प्रत्यक्ष उपयोगावर भर
विद्यार्थ्यांनी शिकलेल्या गोष्टींचा दैनंदिन जीवनातील परिस्थितींशी संबंध जोडता येणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, विज्ञानातील एखादे तत्त्व प्रत्यक्ष परिस्थितीत कसे लागू होते किंवा गणितातील सूत्र कोणत्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी वापरता येते, हे समजणे महत्त्वाचे ठरेल. प्रश्नाचे उत्तर देताना विचार करण्याची प्रक्रिया आणि योग्य स्पष्टीकरण मांडण्याची क्षमता उपयोगी पडणार आहे.
प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदलला का?
सीबीएसईने 2026-27 सत्रासाठी विषयानुसार गुणांचे विभाजन आणि इतर परीक्षा-संबंधित सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत नमुना प्रश्नपत्रिका आणि गुणांकन पद्धती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
16 फेब्रुवारीपासून बोर्ड परीक्षा
सीबीएसईच्या अधिकृत वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या 2027 च्या मुख्य बोर्ड परीक्षा 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा 9 मार्चपर्यंत, तर बारावीची परीक्षा 9 एप्रिलपर्यंत नियोजित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे आता उजळणी, लेखनाचा सराव आणि संकल्पना स्पष्ट करण्यासाठी उपलब्ध वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्यांनी काय करावे?
विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयातील महत्त्वाच्या संकल्पना स्वतःच्या शब्दांत समजावून सांगण्याचा सराव करावा. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवताना उत्तर पाठ न करता त्यामागील तर्क समजून घ्यावा. उत्तर लिहिताना मुद्देसूद मांडणी, योग्य उदाहरणे आणि आवश्यक तेथे आकृत्यांचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.