25 दिवसांत 52 लाख जोडप्यांचे लग्न; 1.25 कोटी लोकांना रोजगार मिळणार, भारताच्या अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठी उलाढाल; लग्नाच्या खर्चाचा आकडा पाहून डोळे फिरतील
25 दिवसांत 52 लाख जोडप्यांचे विवाह सोहळे पार पडणार आहेत. लग्न सराईच्या हंगामामुळे भारतात प्रचंड मोठा आर्थिक उलाढाल होणार असून 1.25 कोटी लोकांना रोजगार मिळणार आहे.
Marriage season : भारतात लग्न सराईचा हंगाम सुरु झाला आहे. भारतात लग्न सोहळे हे रुढी, परंपरासह स्टटेस यासाठी देखील जोडले जातात. लग्नसराईमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. यंदा 21 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान देशभरात जवळपास 52 लाख विवाहसोहळे पार पडण्याची शक्यता आहे. यंदाच्या विवाहसोहळ्यांमधून अंदाजे 7.5 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय निर्माण होऊ शकतो अशी शक्यता कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटने वर्तवली आहे.
25 दिवसांत, सरासरी दररोज 2 लाखांहून अधिक विवाहसोहळे होण्याची शक्यता आहे. CAIT च्या संशोधन आणि व्यापार विकास संस्थेने 25 राज्यांतील 550 हून अधिक व्यापारी संघटना तसेच 300 हून अधिक व्यावसायिकांशी चर्चा करून हा अंदाज वर्तवला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्के अधिक व्यवसाय अपेक्षित आहे.
CAIT ने दिलेल्या माहितीनुसार 2025 च्या विवाह हंगामातील व्यवसाय उलाढाल सुमारे 6.5 लाख कोटी रुपये होती. यंदा मात्र, यात 7.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढू होऊ शकते. यंदा महागाई पाहता 15 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
लग्नसराईत होणारी आर्थिक उलाढाल
यंदाच्या लग्नसाराईत जळपास 7.5 लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. यात 54 टक्के म्हणजेच जवळपास 4.05 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय वस्तू आणि किरकोळ क्षेत्रातून येऊ शकतो. तर, सेवा क्षेत्रातून 3.45 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यातून एकूण व्यवसायाच्या 46 टक्के आहे.
दागिन्यांवर 1.20 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
लग्नसराईच्या काळात सर्वाधिक खर्च सोन्याच्या दांगिन्यांवर होण्याची शक्यता आहे. दागिन्यांनर 1.20 लाख कोटी रुपयांचा खर्च केले जाऊ शकतो असा अंदाज CAIT ने वर्तवला आहे.
कपडे खरेदीवर 90, 000 कोटींचा खर्च
दागिन्यांसह लग्नसराईच्या काळात कपड्यांच्या खरेदीवर देखील मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. कपडे खरेदीवर अंदाजे 90,000 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. भेटवस्तू आणि लग्नाच्या सामानामधून 35,500 कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. किराणा आणि खाद्यपदार्थांमधूनही 35,500 कोटी मिळण्याचा अंदाज आहे. इलेक्ट्रॉनिक्स, सुका मेवा व मिठाई, फर्निचर आणि घरगुती वस्तू यांसारख्या खरेदीतून अंदाजे 30,000 कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे.
केटरिंग आणि बँक्वेट हॉल्सचा व्यवसाय तेजीत
लग्नसराईचा हंगाम केवळ दागिने, कपडे इतकाच मर्यादित नाही तर सेवा क्षेत्राला बंपर नफा मिळवून देणारा आहे. CAIT च्या अंदाजानुसार केटरिंग आणि खाद्य सेवांमधून 75,000 कोटींची उलाढाल होऊ शकते. मंगलकार्यालय, बँक्वेट हॉल आणि हॉटेल्समधून सुमारे 60,000 कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. इव्हेंट मॅनेजमेंट आणि वेडिंग प्लॅनिंगमधून 37,500 कोटींची उलाढाल होऊ शकते. फुलांची सजावट आणि लग्नाच्या सजावटीतूनही 37,500 कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. संगीत आणि मनोरंजन सेवा, तसेच प्रवास आणि वाहतूक यांमधून प्रत्येकी 30,000 कोटींची उलाढाल होऊ शकते. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि सौंदर्य सेवा यांमधून एकत्रितपणे सुमारे 22,500 कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.
लग्नसराईच्या काळात 1.25 कोटी रोजगाराच्या संधी
लग्नसराईच्या काळात आर्थिक उलाढालीसह प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती देखील होऊ शकते. लग्नसराईच्या काळात 1.25 कोटी लोकांना रोजगार मिळू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. CAIT च्या मते, पुढील 25 दिवसांत 1 कोटी पेक्षा जास्त लोकांना तात्पुरत्या, हंगामी तसेच पार्ट टाईम स्वरुपात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. यामध्ये केटरिंग, सजावट, फोटोग्राफी, हॉटेल्स, वाहतूक आणि इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. लग्नसमारंभांच्या वाढत्या मागणीमुळे या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना अतिरिक्त काम मिळण्याची अपेक्षा आहे.
दिल्ली, मुंबई, पुणे, गोवा, राजस्थान यासह भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये भव्य विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. मध्यम वर्गीयांमध्ये कमीत लग्नाचे बजेट 4 लाख ते 5 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. हायप्रोफाईल विवाहसोहळ्यांमध्ये कमीत कमी 4 ते 5 कोटी रुपयांपर्यंत लग्नाचे बजेट असते. यावरुन लक्षात येते की भारतीय अर्थव्यवस्थेला लग्न सोहळ्यांमुळे किती चालना मिळते.
लग्नसमारंभाच्या व्यवसायात डिजिटल आमंत्रणे, ऑनलाइन पेमेंट, एआय-सहाय्यित विवाह नियोजन आणि सानुकूलित भेटवस्तू यांसारखे नवीन ट्रेंडही उदयास येत आहेत. यामुळे लहान दुकानदारांपासून ते
मोठ्या सेवा पुरवठादारांपर्यंत सर्वांसाठी नवीन व्यावसायिक संधी निर्माण होत आहेत. CAIT ने लोकांना या हंगामात भारतीय उत्पादनांना आणि स्थानिक व्यवसायांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. संस्थेच्या मते, लग्नसराईच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे देशांतर्गत उत्पादन, छोटे व्यवसाय आणि स्थानिक सेवा पुरवठादारांना फायदा होऊ शकतो.