बापानेच आपल्या 10 वर्षीय मुलाची केली हत्या, नंतर त्याच्या बाजूला झोपून...; तपासात धक्कादायक खुलासे, आई आली तेव्हा तो..., कुटुंबीय हादरले
अहमदाबादमध्ये अंधश्रद्धेपोटी एका बापानेच आपल्या 10 वर्षांच्या निरागस मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अहमदाबादमध्ये एका बापानेच आपल्या 10 वर्षांच्या निरागस मुलाची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नरेश पटेल असं आरोपीचं नाव असून, त्याने स्थानिक मंदिराजवळ आपल्या मुलाला ठार केलं. अहमदाबादच्या साणंद परिसरातील विंचिया गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी तपास केला असता धक्कादायक खुलासे झाले आहेत. मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी बापाने अंधश्रद्धेपोटी आपल्या मुलाची हत्या केल्याचं उघड झालं. कुटुंबातील अन्य कोणी व्यक्ती 'भुवो' म्हणजेत पारंपारिक धार्मिक विधी करणारा किंवा आत्म्यांशी संपर्क साधणारा व्यक्ती बनू नये, अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितलं जात आहे. मुलाची हत्या केल्यानंतर, पित्याने त्याचा मृतदेह एका खाटेवर ठेवला आणि तो स्वतःही त्या शेजारीच झोपला, असेही समोर आले आहे.
मुलाची आई, भारतीबेन पटेल यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही घटना 1 नोव्हेंबरच्या रात्री घडली. पतीकडून होणारी कथित शारीरिक मारहाण आणि छळामुळे, तिने 10 दिवसांपूर्वीच घर सोडले होते. मुलाची परीक्षा जवळ आली असल्याने तिने त्याला त्याच्या वडिलांकडेच सोडून दिले होते.
1 नोव्हेंबरच्या संध्याकाळी, भारतीबेन यांना एका शेजाऱ्याचा फोन आला. त्याने त्यांना सांगितले की, त्यांच्या पतीने मुलाला काठीने मारहाण केली आहे. यानंतर त्या आपल्या कुटुंबातील सदस्यांसह तातडीने गावाकडे निघाल्या. रात्री नऊच्या सुमारास जेव्हा त्या गावात पोहोचल्या, तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा जोगणीमाता मंदिराच्या जवळ मृतावस्थेत आढळला. यावेळी पती मुलाच्या मृतदेहाशेजारी झोपला होता. तक्रारीनुसार, नरेशच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. भारतीबेन यांनी त्याला विचारले की मुलासोबत नक्की काय घडले, तेव्हा त्याने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.
नरेशने कुटुंबाला सांगितले की, तो आणि त्याचे वडील 'भुवा' (धार्मिक विधी करणारे) होते. त्याने असेही म्हटले की, त्याच्यानंतर कुटुंबातील इतर कोणीही ही भूमिका स्वीकारावी, अशी त्याची इच्छा नव्हती. याच समजुतीतून त्याने करणचे पाय पकडून त्याला मंदिरावर आपटले आणि त्याच्या डोक्यावर काठीनेही प्रहार केला. घटनाक्रम ऐकल्यानंतर कुटुंबातील सदस्य हादरले आणि संतप्त झाले. या घटनेमुळे अंधश्रद्धा आणि हिंसाचाराचा निष्पाप मुलांवर होणारा परिणाम याबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
घटनेनंतर, भारतीबेन यांनी साणंद पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आईच्या तक्रारीवरून नरेश पटेल याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.