'माझ्याशी लग्न कर,' इन्फ्लुएनसर तरुणीच्या घरात घुसला तरुण; नंतर रुममध्येच...; धक्कादायक घटना; पोलीस आले तेव्हा जखमी अवस्थेत...
नेहा बिश्त अलीकडेच इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर तिच्या साखरपुड्याचे व्हिडिओ तसेच आगामी लग्नाशी संबंधित कंटेंट पोस्ट करत होती.
एका तरुणाने इन्फ्लुएन्सर तरुणीच्या घरात घुसून तिला लग्नाची मागणी घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा तरुण चेन्नईचा असून, इन्फ्लुएन्सरला मागणी घालण्यासाठी तिच्या दिल्लीतील घरात पोहोचला होता. यावेळी तो तिला लग्नाची मागणी घालत माझ्याशी लग्न कर असा आग्रह करत होता. मात्र यामुळे तिचे कुटुंबीय संतापले आणि त्याला मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र एका आठवड्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी इन्फ्लुएन्सर तरुणीचे वडील आणि शेजाऱ्यांना अटक केली आहे.
नेहा बिश्त असं या इन्फ्लुएन्सरचं नाव आहे. तिचे इंस्टाग्रामवर 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तिच्या प्रत्येक 'रील'ला लाखो व्ह्यूज मिळतात. मागील काही दिवसांपासून ती आपल्या साखरपुड्याचे आणि लग्नाशी संबंधित व्हिडिओ इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर शेअर करत होती.
अभिनव असं पीडित तरुणाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील गाझीपूरचा रहिवासी होता आणि चेन्नईमधील एका खासगी कंपनीत काम करत होता. 7 नोव्हेंबर रोजी पूर्व दिल्लीतील 'मधु विहार' भागात असलेल्या नेहाच्या घरी तो जबरदस्तीने शिरला. त्यावेळी नेहा घरीच होती. त्याने तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये (FIR) नमूद केल्यानुसार, तो मद्यधुंद अवस्थेत होता.
अभिनवने थेट घरात घुसून मुलीला लग्नाची मागणी घातल्याने कुटुंबीय संतापलं. कुटुंबातील काही सदस्य आणि काही शेजाऱ्यांनी त्याला पोलिसांकडे सोपवण्याआधी मारहाण केली. जेव्हा पोलीस त्यांच्या निवासस्थानी पोहोचले, तेव्हा अभिनव त्यांना जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या पाठीवर आणि उजव्या पायावर गंभीर जखमा होत्या. त्याला राजीव गांधी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान 15 नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
तपासातून समोर आलं आहे की, अभिनव नियमितपणे नेहाचा कंटेंट पाहायचा. कालांतराने त्याच्या मनात तिच्याबद्दल एकतर्फी भावना निर्माण झाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी तो एक चाहता म्हणून तिच्या घरीही गेला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, नेहा बिश्तचे दुसऱ्या तरुणासोबत होणारे लग्न पाहून तो अस्वस्थ होता. दुसरीकडे नेहा बिश्तला अभिनव कोण आहे, हे अजिबात माहीत नव्हते.
पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, कंटेंट क्रिएटरचे वडील वीरेंद्र बिश्त आणि एका शेजाऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणातील इतर संशयितांची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले जात आहे. याप्रकरणी इतर बाजूंनीही तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.