रुग्णालयातून नर्स अचानक झाली बेपत्ता, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; आरोपीची ओळख पटल्यानंतर हॉस्पिटल हादरलं, कारणही धक्कादायक
उथिरा, तिरुपूर जिल्ह्यातील पल्लागौंडमपालयम येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. 15 ऑक्टोबर रोजी ती बेपत्ता झाल्यानंतर पतीने पोलिसांत तक्रार नोंदवली होती.
रुग्णालयातील वॉर्डबॉयने आपल्या महिला सहकाऱ्याची हत्या करुन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तमिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात ही घटना घडली आहे. रामनाथपुरम जिल्ह्यातील रहिवासी असलेली उथिरा, तिरुपूर जिल्ह्यातील पल्लागौंडमपालयम येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. 15 ऑक्टोबर रोजी ती बेपत्ता झाल्यानंतर पतीने पोलिसांत तक्रार नोंदवली होती.
17 ऑक्टोबर रोजी पेरुंदुराई येथील विजयमंगलम टोल गेटजवळ तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पीडितेचा सहकारी सरवनन याची संशयित म्हणून ओळख पटवली. "तिचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने, तो तिला आपल्या दुचाकीवरून घेऊन गेला, तिथे तिची हत्या केली आणि तिचे मंगळसूत्र चोरले," असे इरोड जिल्हा पोलिसांनी सांगितले आहे. 19 ऑक्टोबर रोजी सरवननला अटक करण्यात आली.
पोलिसांनी चोरलेले दागिने जप्त केले आहेत. तसंच आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या हत्येनंतर तामिळनाडूतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा उपस्थित राहिला असून, राजकीय टीकास्त्रही सुरु झाले आहेत. डीएमके (DMK) अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी पोलीस विभागाला हाताळण्यावरुन मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर टीका केली आहे.
"मुख्यमंत्री केवळ नावापुरतेच पोलीस विभागाचे प्रमुख आहेत. ज्याप्रमाणे त्यांनी अनेक विभागांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे सोपवली आहे, तशीच पोलीस विभागाची जबाबदारीही त्यांनी इतर कोणाकडे सोपवली आहे का?" असा सवाल स्टॅलिन यांनी केला. त्यांनी आरोप केला की, वारंवार होणारे हिंसक हल्ले आणि केंद्रीय संस्थांकडून अमली पदार्थांचा होणारा जप्तीचा साठा, हे सर्व मुख्यमंत्र्यांचे पोलीस प्रशासनाकडे असलेले दुर्लक्ष दर्शवतात. "मुख्यमंत्री महोदय, तुमच्या या दुर्लक्षामुळे लोकांचे जीव जात आहेत. 'अमली पदार्थ सोडा, खेळाकडे वळा' असा संदेश देणाऱ्यांनी, आधी स्वतः आरामाचा त्याग करून आपल्या विभागाची सूत्रे हाती घेतली पाहिजेत," असे स्टॅलिन म्हणाले. त्यांनी यावेळी विजय यांच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेचाही संदर्भ दिला.
स्टॅलिन यांनी शिवगंगा जिल्ह्यात रविवारी झालेल्या एका व्यक्तीच्या हत्येचाही उल्लेख केला. ती व्यक्ती जामिनावर बाहेर होती. अशा प्रकारे जामिनावर सुटका झालेल्या व्यक्तींवर पोलिसांची काही देखरेख असते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पोलिसांच्या मते, ही हत्या सूड घेण्याच्या भावनेतून झाली आहे. या प्रकरणातील आरोपीवर दुहेरी हत्येसह किमान डझनभर गुन्हे दाखल असल्याने, पोलिसांनी न्यायालयात त्याच्या जामिनाला विरोध केला होता.