भारताचे 4 राफेल विमान गायब?‘फ्लाइटग्लोबल’च्या अहवालाने देशात खळबळ; काय घडलंय नेमकं?
भारतीय हवाई दलाकडे 36 पैकी केवळ 32 राफेल विमाने सक्रिय असल्याचा फ्लाइटग्लोबलचा दावा आहे. माजी एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांनी अहवाल फेटाळला. संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांच्या संख्येबाबत एक नवा वाद निर्माण झालाय. ब्रिटनमधील संरक्षण आणि विमान वाहतूक क्षेत्रातील नियतकालिक ‘फ्लाइटग्लोबल’च्या ताज्या अहवालाने देशभरात खळबळ उडाली आहे. भारताकडे असलेल्या 36 राफेल विमानांपैकी केवळ 32 विमाने सक्रिय आहेत, असं अहवालात म्हटलंय.मागील वर्षीच्या अहवालात ही संख्या 35 दाखवण्यात आली होती. त्यामुळे 4 विमाने गायब असल्याची चर्चा जोर धरु लागली. एका वर्षात सक्रिय विमानांची संख्या तीनने कमी झाल्याचे या अहवालात म्हटलंय. दरम्यान उर्वरित चार विमाने नेमकी कुठे आहेत? किंवा ती सक्रिय यादीतून का वगळण्यात आली? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
माजी एअर मार्शल काय म्हणाले?
फ्लाइटग्लोबलच्या या आकडेवारीवर भारतीय हवाई दलाचे माजी उपप्रमुख एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांनी आक्षेप घेतला. हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगत नियतकालिकाने माहितीच्या स्रोतांची विश्वासार्हता तपासण्याची मागणी त्यांनी केली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने भारताची राफेल विमाने पाडल्याचा दावा केला होता. त्यावेळी काही विमानांचे विशिष्ट टेल नंबरही प्रसारित करण्यात आले होते. मात्र संबंधित टेल नंबर असलेली विमाने नंतर विविध आंतरराष्ट्रीय लष्करी सरावांमध्ये उड्डाण करताना दिसल्याचे तिवारी यांनी म्हटले.
भारताने फ्रान्सकडून किती राफेल विमाने खरेदी केली?
भारताने फ्रान्सकडून एकूण 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. यामध्ये 28 एक आसनी आणि आठ दोन आसनी विमानांचा समावेश आहे. एक आसनी विमानांना EH, तर दोन आसनी विमानांना DH असे संबोधले जाते. फ्लाइटग्लोबलच्या ‘2027 वर्ल्ड एअर फोर्सेस डायरेक्टरी’मध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 32 सक्रिय राफेल विमाने असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याआधीच्या एडीशनमध्ये 35 विमाने सक्रिय असल्याचे म्हटले होते.
अहवालासाठी कोणती माहिती वापरण्यात आली?
फ्लाइटग्लोबलचा हा अहवाल ब्रिटनमधील विमान वाहतूकविषयक माहिती आणि विश्लेषण क्षेत्रातील कंपनी ‘सिरियम’च्या डेटावर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्देशिकेत जगातील सुमारे 160 देशांच्या लष्करी विमान ताफ्याची माहिती दिली जाते. सिरियम सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेली विमानांची दृश्ये, फ्लाइट ट्रॅकिंग आणि संरक्षणविषयक वृत्तांचा आधार घेते. विमानांची दुरुस्ती, देखभाल किंवा आधुनिकीकरण सुरू असल्यास त्यांची सक्रिय यादीतील नोंद बदलू शकते, असे जाणकार सांगतात.
ऑपरेशन सिंदूरशी या आकडेवारीचा संबंध काय?
मे 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानने भारतीय राफेल विमाने पाडल्याचा दावा केला होता. आता फ्लाइटग्लोबलच्या अहवालातील 32 विमानांच्या आकडेवारीमुळे त्या दाव्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.भारतीय हवाई दलाने जून 2026 मध्ये सर्व 36 राफेल विमानांसाठी देखभाल आणि तांत्रिक सहाय्याशी संबंधित निविदा काढली होती, असं ‘द ट्रिब्यून’ने म्हटलंय.