शिवसेना नेत्याला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; ASI बेडखाली ड्रग्ज लपवताना झाला कैद; VIDEO मुळे राज्यात खळबळ
शिवसेना नेत्याच्या अटकेनंतर धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलं असून, त्याला अडकवण्यात आल्याचं उघड झालं आहे.
शिवसेना नेत्याच्या घरात ड्रग्ज लपवून त्याला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साध्या कपड्यात अधिकाऱ्याने त्याच्या घरात ड्रग्ज ठेवल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. यानंतर ही घटना उघडकीस आली. पंजाबच्या खन्ना शहरातील या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला असून, संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे.
शिवसेना नेते महंत काश्मीर गिरी यांच्या निवासस्थानी रेकॉर्ड या व्हिडिओमध्ये, एएसआय (ASI) सुखदेव सिंग साध्या वेशात एका खोलीत प्रवेश करताना आणि गादीखाली काहीतरी ठेवताना दिसत आहेत. यानंतर काही वेळाच पोलिसांचं एक पथक घरात येते आणि झाडाझडतीस सुरुवात करते. यावेळी पोलिसांनी गादीखाली 30 ग्रॅम हेरॉइन सापडला असल्याचा दावा केला.
त्यानंतर महंत काश्मीर गिरी यांना अटक करण्यात आली. मात्र, सीसीटीव्हीमधील फुटेज समोर आल्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर आणि ज्या परिस्थितीत अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीआयए (CIA) पथकात कार्यरत असलेले एएसआय सुखदेव सिंग हे अधिकृत पोलीस पथक पोहोचण्यापूर्वीच महंत काश्मीर गिरी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. या पथकात सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी विजयपाल सिंग, सिटी पोलीस ठाणे-२ चे प्रभारी तरविंदर कुमार बेदी आणि इतर कर्मचारी यांचा समावेश होता.
ही घटना महंतांचा चालक गुरजंत सिंग जनता याच्या अटकेपासून सुरू झाली; त्याच्याकडे साडेसात ग्रॅम हेरॉइन सापडल्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान महंत काश्मीर गिरी यांचे नाव समोर आले, त्यानंतर पोलीस पथकाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन झडती घेतली.
व्हिडिओची दखल घेत, एसएसपी डॉ. दर्पण अहलुवालिया यांनी एएसआय सुखदेव सिंग यांना निलंबित केले आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (SIT) गठित केले. या प्रकरणातून महंत काश्मीर गिरी यांची सुटका करण्यात आली आहे.
सुखबीर बादल यांची 'आप' सरकारवर टीका
या वादावर प्रतिक्रिया देताना, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी पंजाबमधील आम आदमी पार्टी (AAP) सरकारवर निशाणा साधला आणि त्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.
बादल यांनी 'एक्स' वर लिहिले, "आम आदमी पार्टीच्या 'कायदा व सुव्यवस्था' मॉडेलमध्ये तुमचे स्वागत आहे! खन्ना पोलिसांचा एक एएसआय सीसीटीव्हीमध्ये एका घरात गादीखाली अंमली पदार्थांचे पाकीट लपवताना रंगेहात पकडला गेला! 'आप' पंजाबने सेवांच्या 'होम डिलिव्हरी'चे आश्वासन दिले होते, पण यात पंजाब पोलिसांमार्फत नागरिकांना अडकवण्यासाठी अंमली पदार्थांची 'होम डिलिव्हरी' देखील समाविष्ट असेल, हे कोणाला माहीत होते?" त्यांनी या घटनेवरून मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही प्रश्न विचारले आहेत.