रिक्षा चालकाचे नशीब फळफळले! खोदकाम करताना सापडला 3.17 कॅरेटचा हिरा, किंमत तब्बल...
एका रिक्षा चालकाचे नशीब रातोरात चमकले आहे. खोदकाम करताना त्याला 3.17 कॅरेटचा हिरा सापडला आहे.
मध्य प्रदेशातील एका छोट्याश्या गावातील रिक्षा चालकाचे नशीब फळफळले आहे. रिक्षा चालक सोनू रॅकवार याला लॉटरी लागली आहे. हिऱ्यांचे शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पन्ना गावाने सोनूला एका रात्रीत मालामाल बनवलं आहे. खोदकाम करताना त्यांना 3.17 कॅरेटचा हिरा सापडला आहे. आता हा हिरा त्यांनी कार्यालयात जमा केला आहे.
हिरा पारखी अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिऱ्याची किंमत अंदाजे 15 लाख इतकी आहे. हिरा कार्यालयात आत्तापर्यंत 175 हिरे जमा करण्यात आले असून त्यांचे एकूण वजन 387.21 कॅरेट असून अंदाजे 3 कोटी रुपये किंमत असू शकते. हिऱ्यांची अंतिम लिलाव डिसेंबर 2024 मध्ये झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनूला गेल्या महिन्याभरापासून स्वप्न पडत होते की त्याला हिरा सापडला आहे. त्याने कुटुंबाला जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा कुटुंबाने त्याला खाण सुरु करण्याची कल्पना दिली होती. त्यानंतर त्यांनी हिरा कार्यालय ते रानीपुर क्षेत्रात पहिल्यांदा खाणकाम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 15 दिवसांत त्याला मेहनतीचे फळ मिळाले.
सोनूला खाणीत 3.17 कॅरेटचा हिरा मिळाला होता. या हिऱ्याची किंमत 11 ते 15 लाख रुपये सांगितली जात आहे. सोनुच्या म्हणण्यानुसार, लिलावातून मिळालेल्या रक्कमेतून तो आणखी खाण सुरू करण्यात आल्याचा त्यानी म्हटलं आहे. कारण त्यांना आताही हिरा मिळण्याची स्वप्न येतात.
पन्ना येथे हिरे का सापडतात?
मध्य प्रदेशातील पन्ना येथे अतीव दाब आणि उष्णतेखाली तयार झालेले किंबरलाइट खडकांचे थर आणि गाळाचे साठे असल्यामुळे नैसर्गिक हिरे मोठ्या प्रमाणात मिळतात. पन्ना हा विंध्य खोऱ्याच्या उत्तर भागात स्थित असून, येथील मझगवां आणि हिनोता येथील किंबरलाइट पाईप्स तसेच गाळाच्या मातीमध्ये हिऱ्यांचे साठे आढळतात.
देशातील उपलब्ध हिऱ्यांच्या साठ्यांपैकी मोठा हिस्सा मध्य प्रदेशात (प्रामुख्याने पन्ना परिसरात) आहे. सरकारी नियमांनुसार लहान जमिनीचा पट्टा घेऊन स्थानिक लोक माती चाळून हिऱ्यांचा शोध घेतात आणि सापडलेले हिरे सरकारी कार्यालयात जमा करून लिलावाद्वारे विकले जातात.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी मोतीलाल यांना 1.5 कोटी रुपयांचा हिरा सापडला होता. 2018 साली मध्य प्रदेशातील बुंदेलखंडमध्ये मिळेल ते काम करून जेमतेम उदरनिर्वाह करणाऱ्या एका 50 वर्षीय व्यक्तीचे नशीब रातोरात उजळले होते. मोतीलाल प्रजापती यांनी एक भूखंड भाड्याने घेतला आणि काही आठवड्यांतच त्यांचे नशीब उजळले. त्यांना अंदाजे1.5 कोटी रुपये किमतीचा एक हिरा सापडला. त्यांनी भोपाळपासून 413 किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्नाच्या हिऱ्यांच्या खाण प्रदेशातील कृष्णा कल्याणपूर पट्टी गावाजवळ 25 चौरस फुटांचा भूखंड भाड्याने घेतला होता. त्या भूखंडाने रातोरात त्यांचे आयुष्य बदलून टाकले.