सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण नेमकी कशामुळे? ग्राहकांना दिलासा देणारी 3 कारणे आहेत? आताच घ्या जाणून!
Gold Silver Price: आठवडाभरात सोन्याचा भाव ११ हजारांहून अधिक, तर चांदीचा दर किलोमागे १७ हजार रुपयांनी घसरला. घसरणीमागची 3 कारणे जाणून घेऊया.
सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या आठवड्यात सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अवघ्या काही दिवसांत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅममागे 11 हजार रुपयांहून अधिक कमी झाला, तर चांदीचा भाव प्रतिकिलोमागे जवळपास 18 हजार रुपयांनी घसरलाय. घसरणीमागची 3 महत्वाची कारणे जाणून घेऊया.
आठवडाभरात सोन्याच्या दरात घसरण
16 नोव्हेंबर 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 34 हजार 971 रुपये होता. 20 नोव्हेंबरपर्यंत हा दर घसरून 1 लाख 23 हजार 893 रुपयांवर आला. म्हणजेच अवघ्या चार दिवसांत सोन्याच्या दरात 11 हजार 78 रुपयांची घट झाली. सोन्याच्या किमतीतील या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
चांदीही झाली स्वस्त
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. 16नोव्हेंबरला एक किलो चांदीचा दर 1 लाख 70 हजार 251 रुपये होता. 20 नोव्हेंबरच्या अखेरच्या उपलब्ध दरानुसार तो 1 लाख 52 हजार 528 रुपयांवर आला. म्हणजेच किलोमागे 18 हजार 723 रुपयांची घट झाली आहे. औद्योगिक मागणी आणि जागतिक बाजारातील पुरवठ्याचा परिणाम चांदीच्या किमतीवर होत असल्याचे सांगितले जात आहे.
24,22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर किती?
20 नोव्हेंबर 2026 च्या आयबीजेएच्या अखेरच्या उपलब्ध आकडेवारीनुसार सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. 24 कॅरेट सोने : 123893 रुपये प्रति 10 ग्रॅम. 22 कॅरेट सोने : 113486 रुपये प्रति 10 ग्रॅम. 18 कॅरेट सोने : 92920 रुपये प्रति 10 ग्रॅम. 14 कॅरेट सोने : 72477 रुपये प्रति 10 ग्रॅम चांदी : 152528 रुपये प्रति किलो आहे. हे दर GST आणि दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसशिवाय आहेत.
सोन्याचे भाव घसरण्यामागे तीन प्रमुख कारणे
सोन्याच्या किमतीवर सर्वाधिक परिणाम अमेरिकन डॉलरच्या मजबुतीचा होत आहे. डॉलर मजबूत झाल्यास इतर देशांतील गुंतवणूकदारांसाठी सोने महाग पडते आणि मागणीवर परिणाम होतो. दुसरे कारण म्हणजे अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्यता. व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदार सोन्याऐवजी बँक ठेवी आणि सरकारी रोख्यांकडे वळू शकतात. तिसरे कारण म्हणजे नफावसुली. यापूर्वी सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर मोठे गुंतवणूकदार नफा मिळवण्यासाठी सोने विकत आहेत.
पुढे काय होणार?
चांदीचा वापर दागिन्यांबरोबरच विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये केला जातो. औद्योगिक मागणीतील घट आणि जागतिक बाजारातील पुरवठा वाढल्यास चांदीच्या दरावर दबाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सध्याच्या घसरणीनंतर दर किती खाली जातील किंवा पुन्हा वाढतील, याचा निश्चित अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांनी स्थानिक सराफाकडील अंतिम दर, हॉलमार्क आणि बिलातील GST व मेकिंग चार्जेस तपासूनच खरेदी करावी.