भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे दुःखद निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भाजपचे जेष्ठ नेत आणि राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली.
आठ महिन्यापूर्वीच भाजपकडून रामराव वडकुते यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. अत्यंत प्रगल्भ आणि निष्कलंक राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. शेळी मेंढी महासंघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिलं आहे. राज्यातील धनगर समाजाचे नेतृत्व करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. तसंच, निष्कलंक आणि भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती.
रामराव वडकुते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते होते आणि त्यांनी पक्षाच्या कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी आमदार असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, 2021 मध्ये त्यांची हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
रामराव वडकुते यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. 7 महिन्या पूर्वी भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. त्यांच्या निधनाने राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करत रामराव वडकुते यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'भाजपचे राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ नेते रामराव वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक सालस आणि साधे व्यक्तिमत्व राजकारणातून हरपले आहे.हिंगोली जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर त्यांनी अनेक जबाबदाऱ्या भाजपामध्ये सांभाळल्या. धनगर समाजासाठी मोठे काम त्यांनी केले.'
ते पुढे म्हणाले की, 'शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. सहकारात सुद्धा त्यांनी आपल्या नेतृत्वाची छाप पाडली. तळागाळातील समाजासाठी त्यांची कणव सातत्याने जाणवायची.'