1 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेल भरताना लागणार 1 टक्के चार्ज, नव्या नियमांचा भुर्दंड कोणाला?
SBI क्रेडिट कार्डचे 1 डिसेंबर 2026 पासून नवे नियम लागू होणार आहेत. फ्युएल खर्च 50 हजारांपेक्षा आणि ट्रान्सपोर्ट व्यवहार 30 हजारांपेक्षा जास्त असल्यास 1% शुल्क लागू होईल. संपूर्ण गणित जाणून घ्या.
स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीाय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 1 डिसेंबर 2026 पासून फ्युएल आणि ट्रान्सपोर्टेशनशी संबंधित काही व्यवहारांवर 1 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, प्रत्येक पेट्रोल पंपावरील व्यवहार किंवा प्रवासाचे पेमेंट महागणार नाही. ठरावीक मर्यादा ओलांडल्यानंतरच हे शुल्क लागू होईल. एसबीआय कार्डने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे नवीन नियम नेमके कसे आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
1 डिसेंबरपासून नवीन शुल्क लागू
1 डिसेंबर 2026 पासून पात्र फ्युएल आणि ट्रान्सपोर्टेशन व्यवहारांवर 1 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. या दोन्ही प्रकारच्या व्यवहारांसाठी मर्यादा वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. फ्युएलसाठी एका बिलिंग सायकलमधील एकूण खर्चाचा विचार केला जाणार आहे, तर ट्रान्सपोर्टेशनसाठी प्रत्येक स्वतंत्र व्यवहाराची रक्कम तपासली जाणार आहे. एसबीआय च्या सुधारित नियमांमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे.
बिलिंग सायकलमध्ये फ्युएलवर 50 हजारांची मर्यादा
एका बिलिंग सायकलमध्ये एसबीआय क्रेडिट कार्डवरून केलेला पात्र फ्युएल खर्च 50 हजार रुपयांपेक्षा जास्त झाल्यास संपूर्ण खर्चावर 1 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. उदाहरणार्थ, पेट्रोल-डिझेलसाठी 60 हजार रुपये खर्च झाल्यास 600 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहेत. खर्च 75 हजार रुपये असल्यास शुल्क 750 रुपये असेल.यात महत्त्वाचे म्हणजे, हे शुल्क केवळ 50 हजार रुपयांवरील अतिरिक्त रकमेवर आकारले जाणार नाही, तर संपूर्ण पात्र फ्युएल खर्चावर लागू होईल. मात्र, खर्च 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास हे नवीन शुल्क लागणार नाही, याची ग्राहकांनी नोंद घ्या.
ट्रान्सपोर्टेशनच्या एका व्यवहारावर किती मर्यादा?
वाहतुकीशी संबंधित प्रत्येक पात्र व्यवहाराची रक्कम 30 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यावर 1 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. उदाहरणार्थ, एका व्यवहारात 40 हजार रुपयांचे पेमेंट केल्यास 400 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. मात्र, 30 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या व्यवहारावर हे शुल्क लागणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आलंय.येथे संपूर्ण महिन्यातील वाहतूक खर्च एकत्र मोजला जाणार नाही. प्रत्येक स्वतंत्र व्यवहाराची रक्कम तपासली जाईल, याची नोंद घ्या.
कोणत्या व्यवहारांना लागू होणार नियम?
SBI Card ने या शुल्कांसाठी विशिष्ट मर्चंट कॅटेगरी कोड (MCC) निश्चित केले आहेत. फ्युएलसाठी MCC 5172, 5541, 5542 आणि 5983, तर ट्रान्सपोर्टेशनसाठी MCC 4111, 4784 आणि 4131 लागू असतील. हे कोड पेमेंट नेटवर्क भागीदार ठरवतात आणि त्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे एखादा व्यवहार कोणत्या श्रेणीत नोंदवला जातो, यावर शुल्क अवलंबून असेल.
जीएसटी आणि आधीच्या फ्युएल सरचार्जचे काय?
नवीन 1 टक्के शुल्कासह लागू करही आकारला जाऊ शकतो. तसेच, हे नवीन शुल्क आधीपासून आकारल्या जाणाऱ्या फ्युएल सरचार्जपेक्षा वेगळे आहे. निवडक कार्डांवरील फ्युएल सरचार्ज माफीच्या अटी पूर्वीप्रमाणे लागू राहणार आहेत.