आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?
ईपीएफओने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी PF मधून मासिक, तिमाही किंवा सहामाही पैसे काढण्याच्या SWP योजनेला मंजुरी दिली. किमान शिल्लक आणि पीएफ काढण्याच्या प्रतीक्षा कालावधीतही बदल होणार आहे.
नोकरी करताना दरमहा पगारातून जमा होणाऱ्या भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफचा वापर निवृत्तीनंतर कसा करायचा?, याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता निवृत्तीनंतर संपूर्ण पीएफ रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी ठरावीक कालावधीत हप्त्यांमध्ये पैसे घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय विश्वस्त मंडळ म्हणजेच सीबीटीने मंजुरी दिली आहे. या सुविधेला सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजेच एसडब्ल्यूपी असे नाव देण्यात आले आहे. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफमधून नियमित उत्पन्न मिळण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय PF काढण्याच्या नियमांमध्येही काही महत्त्वाचे बदल मंजूर करण्यात आले आहेत. काय घडलंय नेमकं? याचा कर्मचाऱ्यांना कसा होणार फायदा? सविस्तर जाणून घेऊया.
एसडब्ल्यूपीला मंजुरी
ईपीएफओ बैठकीत एसडब्ल्यूपी योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या सुविधेनुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची संपूर्ण पीएफची रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी मासिक, तिमाही किंवा सहामाही हप्त्यांमध्ये घेता येईल. ही सुविधा ऐच्छिक असेल. म्हणजेच, कर्मचाऱ्याला संपूर्ण रक्कम एकरकमी काढायची असल्यास तो पर्यायही कायम राहणार आहे.
उर्वरित पीएफ रकमेवर मिळत राहणार व्याज
एसडब्ल्यूपी सुविधेचा महत्त्वाचा फायदा म्हणजे पैसे हप्त्यांमध्ये काढल्यानंतर उर्वरित रक्कम पीएफ खात्यातच राहणार आहे. या शिल्लक रकमेवर नियमानुसार व्याज मिळत राहील. त्यामुळे निवृत्तीनंतर संपूर्ण बचत एकाच वेळी खर्च होण्याऐवजी गरजेनुसार पैसे वापरण्याची संधी मिळेल. सदस्याला SWP थांबवून उर्वरित रक्कम काढण्याची मुभा देण्याचाही प्रस्ताव आहे. सदस्याचा हप्ते मिळण्याच्या कालावधीत मृत्यू झाल्यास नॉमिनी किंवा अवलंबित व्यक्तीला उर्वरित रक्कम काढता येईल किंवा हप्ते सुरू ठेवता येतील.
सुरुवातीला 6.32 लाख सदस्यांना फायदा
सुरुवातीच्या टप्प्यात 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या आणि पीएफ खात्यात 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा असलेल्या सुमारे 6.32 लाख सदस्यांना या सुविधेचा फायदा होणार आहे. भविष्यात निवृत्त होणाऱ्या इतर सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरी कोणाला या सुविधेसाठी पात्र ठरवले जाणार, किती रक्कम काढता येणार आणि हप्त्यांचे नेमके स्वरूप काय असेल? याचा तपशील येणे बाकी आहे.
किमान शिल्लक 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर
एसडब्लूपीसोबतच पीएफ काढण्याच्या नियमांमध्येही महत्त्वाचा बदल मंजूर करण्यात आला आहे. सदस्याच्या खात्यात कायम ठेवावी लागणारी किमान शिल्लक 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पात्र सदस्यांना त्यांच्या जमा रकमेचा अधिक भाग काढण्याची मुभा मिळू शकते. तसेच अंतिम पीएफ रक्कम काढण्यासाठीची प्रतीक्षा कालमर्यादा 12 महिन्यांवरून दोन महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामुळे नोकरी सोडल्यानंतर पीएफ रक्कम मिळण्यासाठी वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
नियम कधी लागू होणार?
ईपीएफओने यूएएनशी जोडलेल्या डिजिटल यंत्रणेद्वारे कर्मचाऱ्यांना स्वतःहून पीएफमध्ये योगदान देण्याची सुविधा आणण्याचाही प्रस्ताव मंजूर केलाय. याशिवाय ग्राहकांकडून मिळणाऱ्या टिप्ससारख्या छोट्या रकमा तृतीय पक्षाच्या माध्यमातून पीएफ खात्यात जमा करण्याची यंत्रणा विकसित केली जाणार आहे. यामुळे गिग वर्कर्स आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही निवृत्तीसाठी बचत करण्याची संधी मिळणार आहे.