सोन्याचे दर घसरताच वाढली गोल्ड लोन कंपन्यांची चिंता ! RBI चा बँका, फायनान्स कंपन्यांवर वॉच; कर्जदारांवर काय परिणाम?
सोन्याचे दर घसरल्याने गोल्ड लोन कंपन्यांची चिंता वाढली. आरबीआय बँका आणि एनबीएफसीच्या कर्ज पोर्टफोलिओवर लक्ष ठेवत आहे. एलटीव्हीचे नियम आणि कर्जदारांवरील परिणाम जाणून घ्या.
सोन्याचे दर वाढले की दागिने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढते. मात्र, आता सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे गोल्ड लोन देणाऱ्या बँका आणि वित्तीय कंपन्यांची चिंता वाढली आहे. कारण सोन्याच्या बदल्यात दिलेल्या कर्जाची रक्कम कायम असते; पण सोन्याचे बाजारमूल्य कमी झाल्यास कर्ज देणाऱ्या संस्थांसाठी जोखीम वाढते. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच गोल्ड लोन पोर्टफोलिओवर अधिक बारकाईने लक्ष ठेवते. याचा कर्जदारांवर काय परिणाम होतो? जाणून घेऊया.
कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर दबाव
जानेवारीतील उच्चांकाच्या तुलनेत सोन्याचे दर सुमारे 30 टक्क्यांनी घसरले आहेत. याचा परिणाम आधीच जास्त किमतीच्या आधारावर मंजूर झालेल्या गोल्ड लोनवर होत आहे. ग्राहकाने दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले असेल आणि नंतर सोन्याचे मूल्य कमी झाले, तर कर्जाची थकबाकी मात्र तितकीच राहते. त्यामुळे कर्जाच्या तुलनेत तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याचे मूल्य कमी होण्याची शक्यता असते.
आरबीआयकडून तपासणी
आरबीआयचे पर्यवेक्षकीय अधिकारी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFC) गोल्ड लोन पोर्टफोलिओची तपासणी करत आहेत.
ब्लूमबर्गने यासंदर्भात माहिती दिलीय. कर्जवसुली, थकीत कर्जे आणि तारण ठेवलेल्या सोन्याच्या मूल्याच्या तुलनेत दिलेल्या कर्जाचे प्रमाण तपासले जात आहे. असे असले तरी आतापर्यंत नियमांचे उल्लंघन झाल्याचा पुरावा आढळला नाही, असेही म्हटलं गेलंय.
गोल्ड लोन बाजार 23 लाख कोटी रुपयांवर
भारताचा गोल्ड लोन बाजार गेल्या पाच वर्षांत जवळपास पाचपट वाढून 23 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. यातील सुमारे 60 टक्के व्यवहार अनौपचारिक क्षेत्रात असल्याचे अहवालात नमूद आहे. सप्टेंबरपर्यंत बँकिंग क्षेत्रातील एकूण कर्जात गोल्ड लोनचा वाटा सुमारे 2.5 टक्के होता. त्यामुळे सध्या संपूर्ण बँकिंग व्यवस्थेला मोठा धोका असल्याचे चित्र नाही. असे असले तरी या क्षेत्रातील वाढ आणि कर्जवसुलीवर लक्ष ठेवणे आवश्यक बनले आहे.
तणावाचे संकेत
काही कंपन्यांच्या आकडेवारीत गोल्ड लोनवरील परतफेडीचा दबाव वाढल्याचे दिसते. आयआयएफएल फायनान्सच्या गोल्ड लोन विभागातील एनपीए सप्टेंबरअखेर 0.9 टक्क्यांवर पोहोचला. मागील तिमाहीत तो 0.6 टक्के होता. बजाज फायनान्समध्ये परतफेडीचा ताण असलेल्या गोल्ड लोनचे प्रमाण 1.87 टक्क्यांवरून 2.2 टक्क्यांवर गेले.या आकड्यातून वाढत्या जोखमीचे संकेत मिळतात.
कर्जदारांनी काय लक्षात ठेवावे?
आरबीआयच्या 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेल्या सुधारित नियमांनुसार, वैयक्तिक वापरासाठी दिल्या जाणाऱ्या गोल्ड लोनवर कमाल कर्ज-मूल्य गुणोत्तर (LTV) मर्यादा निश्चित आहे. 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी : 85 टक्के, 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत : 80 टक्के, 5 लाख रुपयांपेक्षा अधिक : 75 टक्के मर्यादा आहे. ही मर्यादा संपूर्ण कर्जकालावधीत कायम राखणे कर्जदात्यांसाठी बंधनकारक आहे. त्यामुळे गोल्ड लोन घेणाऱ्यांनी परतफेडीचे वेळापत्रक, व्याज आणि कर्ज करारातील अटी समजून घ्याव्यात. कर्जाची परतफेड न झाल्यास नियमानुसार नोटीस देऊन तारण ठेवलेल्या दागिन्यांचा लिलाव होऊ शकतो,हे कर्जदारांनी लक्षात ठेवायला हवे.