आंतरजातीय प्रेमामुळे 21 वर्षीय लेकीला संपवलं; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे बापाचा भांडाफोड!
गुजरातच्या आनंद जिल्ह्यात आंतरजातीय प्रेमसंबंधाला विरोध करत वडिलांनी 21 वर्षीय मुलीची हत्या केली. सुरुवातीला आत्महत्या असल्याचा दावा वडिलांनी केला. पण पोस्टमॉर्टेम अहवालातून सत्य उघड झालं.
गुजरातच्या आनंद जिल्ह्यातून ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. खंभात तालुक्यातील मेटपूर गावात 21 वर्षीय सानिया पटेल हिची तिच्याच वडिलांनी गळा आवळून हत्या केली. दुसऱ्या जातीतील तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधाला वडिलांचा विरोध होता. याच कारणावरून घरात वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कौशलकुमार पटेल असे आरोपी वडिलांचे नाव असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
पहाटे स्वयंपाकघरात घडली घटना
9 नोव्हेंबरच्या पहाटे सुमारे 3.15 वाजता ही घटना घडली. घरातील इतर सदस्य झोपलेले असताना कौशलकुमार यांनी मुलगी सानियाला स्वयंपाकघरात गाठले. तिच्या प्रेमसंबंधावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. वडिलांनी तिला संबंधित तरुणासोबतचे संबंध संपवण्यास सांगितले; मात्र सानियाने त्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या वडिलांनी तिच्याच दुपट्ट्याने गळा आवळल्याचा आरोप आहे. गळा आवळल्यामुळे सानियाचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली.
मुलीच्या मृत्यूला आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न?
घटनेनंतर सुरुवातीला सानियाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, मृतदेह तपासताना खंभात येथील रुग्णालयातील डॉक्टरांना गळ्याभोवती संशयास्पद खुणा आढळल्या. त्यामुळे त्यांनी शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणी करण्याची शिफारस केली. त्यानंतर मृतदेह करमसद येथील कृष्णा रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात गळ्यावर दाब पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुरुवातीला आत्महत्येचा वाटणारा प्रकार हत्येचा असल्याचे तपासातून उघड झाले.
आरोपी वडिलांची कबुली
चौकशीदरम्यान कौशलकुमार यांनी मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी रात्री त्यांना अटक करण्यात आली. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले.खंभात टाउन पोलीस ठाण्याचे निरीक्षक पी. जे. बंटवा यांनी यासंदर्भात माहिती दिली.
प्रेमसंबंधाबरोबर तरुणाच्या उत्पन्नालाही विरोध
सानिया आणि संबंधित तरुणाचे जवळपास वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. दोघांची जात वेगळी असल्याने वडिलांचा या नात्याला विरोध होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. संबंधित तरुणाचे मासिक उत्पन्न 10 ते 15 हजार रुपये असल्यानेही कौशलकुमार नाराज होते, असे पोलिसांनी सांगितले. सानियाने वडोदरा येथून बी.कॉम.चे शिक्षण पूर्ण केले होते आणि ती पुढील अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. या घटनेने आंतरजातीय विवाह आणि वैयक्तिक निवडीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.