"भारताचा वाढलेला विकास दर प्रेसिडंट ट्रम्प यांनाच कोठे दिसला ते माहीत नाही, पण ट्रम्प यांनी भारताच्या विकास दराची तारीफ केली आहे व अमेरिकन मध्यवर्ती बँकेला (फेडरल रिझर्व्ह) फटकारले आहे. प्रेसिडंट ट्रम्प यांना भारताचा हा क्रांतिकारक विकास दर नक्की कोठे दिसला, हा अर्थतज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे, भारतीय अर्थव्यवस्था संकटात आहे व ती केव्हाही कोसळेल असा इशारा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या भूमीवरून दिला आहे. त्या वक्तव्याचा धुरळा खाली बसत नाही तोच प्रत्यक्ष प्रेसिडंट ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची तारीफ केली. राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मोदी यांनी प्रेसिडंट ट्रम्प यांना प्रवत्केपदी नेमले असेच दिसते," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
जाणीवपूर्वक दुर्लक्ष
"भारतीय अर्थव्यवस्थेचे काैतुक सुरू असताना अमेरिकेच्या भूमीवर प्रेसिडंट ट्रम्प यांनी भारतीयांचे जे ‘हाल’ केले आहेत त्यावर आमचे परराष्ट्र मंत्रालय, पंतप्रधान मोदी हे गप्पच आहेत. गेल्या 18 महिन्यांत अमेरिकेत सहा हजार भारतीयांना अटक केली आहे. अमेरिकेतील भारतीयांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘इमिग्रेशन’ कारवाईचा बसलेला हा फटका आहे. आतापर्यंत अमेरिकेत एकाच वेळी इतक्या भारतीयांना कधीच अटक झाली नव्हती. 2025 ते 2026 या काळात यूएस इमिग्रेशन अॅण्ड कस्टम्स एन्फोर्समेंटने 6,111 भारतीयांना बेड्या ठोकल्या. त्यातील 5,235 जणांना डिपोर्टेशन सेंटरमध्ये ठेवले. 2400 जणांना देशातून हद्दपार केले. त्यांच्या हातापायांत बेड्या जखडून भारतात उतरवले. निदान भारतीय भूमीवर उतरताच तरी त्या बेड्या काढायला हव्या होत्या. कारण येथे भारताचा कायदा चालतो. प्रेसिडंट ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारतीय भूमीवरही मनमानी केली. या सर्व लोकांचा गुन्हा काय, तर त्यांच्याकडे अमेरिकेत वास्तव्य करण्याबाबतची अधिकृत कागदपत्रे नव्हती. प्रेसिडंट ट्रम्प यांच्या धोरणांनुसार ते घुसखोर होते. अमेरिकन कम्युनिटी मिडिया आणि स्टॉप एएपीआय हेट यांच्या अहवालानुसार या अटकेतील बहुसंख्य व्यक्ती निर्दोष होत्या. त्यांच्यावर कोणताही आरोप किंवा गुह्यांची कारवाई प्रलंबित नव्हती. ही भारतीयांची मानहानी सुरू असताना प्रेसिडंट ट्रम्प यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले," असं 'सामना'च्या 'गांधी विरुद्ध ट्रम्प, भारतीय अर्थव्यवस्था व इतर' मथळ्याखालील अग्रलेखात म्हटलं आहे.
ट्रम्प यांना वाटते भारतीय वंशाचे लोक त्यांना...
"चिनी, रशियन, फ्रेंच, युरोपियन लोकही अशा पद्धतीने अमेरिकेच्या भूमीवर राहत आहेत, पण त्यांना अशा प्रकारे बेड्यांनी जखडून त्यांच्या देशात परत पाठवण्याची हिंमत प्रेसिडंट ट्रम्प यांनी दाखवली नाही. ट्रम्प यांच्या कारवाईमुळे अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांत दहशत निर्माण झाली. त्यांना अपमानाचा सामना करावा लागला व भारताच्या विदेश मंत्रालयाने भारतीयांबाबत किंचितही सहानुभूती दाखवली नाही. कॅलिफोर्नियात ही कारवाई अधिक उग्र आणि अमानवी पद्धतीची होती. फ्रेस्नो, बेकर्सफील्ड, स्टॉकटन आणि सॅन बर्नार्डिनो या भागांत हजारच्या आसपास भारतीयांची धरपकड केली. घरात घुसून भारतीयांना बेड्या ठोकल्या. यात अनेक लोक कायदेशीर नागरिक होते. कॅलिफोर्नियातील लाँग बीच येथील नटराज कुझिन ऑफ इंडिया अॅण्ड नेपाल रेस्ट्रॉरंटच्या माजी सहमालक असलेल्या 60 वर्षीय भारतीय वंशाच्या बलजित ‘बबली’ काैर यांचे प्रकरण गंभीर आहे. त्यांना ग्रीन कार्ड अर्जाशी संबंधित बायोमेट्रिक्स परीक्षणासाठी बोलावण्यात आले होते. त्या 1994 पासून अमेरिकेत राहतात. त्यांच्याकडे ग्रीन कार्ड आहे. त्या अमेरिकेच्या अधिकृत नागरिक आहेत. तरीही त्यांना ताब्यात घेतले, बेड्या ठोकल्या व तुरुंगात पाठवले. हे का केले? त्यांचे कुटुंबीय म्हणतात, ‘‘आम्ही भारतीय असल्यामुळेच लक्ष्य केले.’’ प्रेसिडंट ट्रम्प प्रशासन भारतीयांचा तिरस्कार करते. ट्रम्प यांना वाटते भारतीय वंशाचे लोक त्यांना मतदान करत नाहीत. त्यामुळे त्यांना इथून बाहेर काढले पाहिजे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.
इतका द्वेष का?
"पंतप्रधान मोदी मुसलमान मतदारांच्या बाबतीत जे भारतात करतात तेच प्रेसिडंट ट्रम्प भारतीयांच्या बाबतीत अमेरिकेत करत आहेत. भारतातही ‘घुसखोरी’ विषयाचे राजकारण निवडणुकीच्या तोंडावर केले जाते व त्यानिमित्ताने मुसलमानांना मतदानापासून दूर ठेवण्याचा डाव खेळला जातो. ट्रम्प अमेरिकेत तोच खेळ मांडून भारतीयांना छळत आहेत. जे भारतीय अमेरिकेत कायदेशीर मार्गाने राहत आहेत, त्यांनाही घुसखोर ठरवून तुरुंगात डांबणे हे योग्य नाही व मोदी यांनी त्यांचे मित्र ट्रम्प यांची कानउघडणी केली पाहिजे. अमेरिकेत कायदा आहे, पण कायद्याचे राज्य नाही. भीती निर्माण करून राजकारण केले जाते. भारतीय पर्यटक, विद्यार्थी, लेबर, उद्योजक अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा उचलतात. उपराष्ट्रपतीपदी राहिलेल्या कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. सध्याचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांच्या पत्नी उषादेखील भारतीय आहेत आणि प्रेसिडंट ट्रम्प यांना आव्हान देत मिशिगनमधून निवडून आलेले अब्दुल्ला यांचेही भारताशी नाते आहे. एफबीआयचे नेतृत्वही एक भारतीयच करत आहे. प्रेसिडंट ट्रम्प यांच्या अवतीभवती भारतीय आहेत व ते उत्तम कामगिरी पार पाडत आहेत. तरीही अमेरिकेत राहणाऱ्या सामान्य भारतीयांविषयी ट्रम्प यांना इतका द्वेष का?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
अंधभक्तांना आनंदाचे भरतेच आले असेल
"ट्रम्प एका बाजूला भारताच्या विकास दराचे काैतुक करतात, त्याच वेळी अमेरिकेतील भारतीयांना हजारोंच्या संख्येत अटक करतात. प्रेसिडंट ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या केलेल्या काैतुकामुळे मोदी वगैरे लोकांना गुदगुल्या होत असतील तर मग अमेरिकेतील भारतीयांच्या सुरू असलेल्या छळाबाबतही चीड, संताप यायला हवा. कोसळत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोदी यांच्याशी मी खुली चर्चा करायला तयार आहे असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले. मोदी यांनी राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी प्रेसिडंट ट्रम्प यांना उतरवले याबद्दल अंधभक्तांना आनंदाचे भरतेच आले असेल," असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला आहे.