बीडच्या माजलगाव येथील गढी रोडवर झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून २० नोव्हेंबर रोजी दुपारी घडलेल्या या अपघातामध्ये गायकवाड दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
माजलगाव येथील भाजपाचे नगरसेवक दिलीप मेंडके यांचा मुलगा दक्ष मेंडके हा युवक चार चाकी गाडी चालवत होता. यावेळी तरुणांची गाड्यांची रेस सुरू होती, असे स्थानिकांनी सांगितले. तसेच या रेसच्या नादातच दुचाकीवरील कुटुंबाला शंभर ते दीडशे फूट फरफटत नेले, असे येथील प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
गढी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ त्याची कार आली असता त्याने समोरून येणाऱ्या गायकवाड यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून यामध्ये धडकेनंतर गायकवाड दाम्पत्य हे हवेत उंच उडून खाली रस्त्यावर पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.
बीडच्या माजलगावमधील गढी रोडवर झालेल्या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी हा अपघात झाला होता.. दक्ष मेंडके याची कार पेट्रोल पंपाजवळ आली असता समोरून येणाऱ्या गायकवाड दांपत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर गायकवाड दांपत्य हवेत उडून रस्त्यावर कोसळल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे..
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 22, 2026
या अपघातात प्रल्हाद गायकवाड हे जागीच ठार झाले होते तर सुनीता गायकवाड यांना उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा अपघात दोन मित्रांमध्ये गाड्यांच्या शर्यतीतून घडल्याची चर्चा माजलगाव शहरात होत असून त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत.