नाशिकच्या आरटीओ विभागातील सेवानिवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी हेमंत हेमाडे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं होतं. या घटनेनंतर त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीतून कौटुंबिक वादाचं कारण समोर आलं आहे. मालमत्तेच्या वादातून हेमंत हेमाडे यांचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ केला जात होता. न्यायालयीन प्रकरणं मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात होता. तसंच जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप पत्नी योगिता हेमाडे यांनी केला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळूनच हेमाडे यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा पत्नीने केला आहे.
योगिता हेमाडे या हेमंत हेमाडे यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर हेमाडे यांनी 15 वर्षांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं. या लग्नामुळे पहिल्या पत्नीची दोन्ही विवाहित मुले त्यांच्यावर नाराज होती. त्यानंतर हा मालमत्तेचा वाद सुरू झाला असा दावा योगिता हेमाडे यांनी केला आहे.
हेमंत हेमाडे यांच्या पत्नीने असंही देखील म्हटला आहे की, गेल्या काही महिन्यांपासून अनेक वेळा माझ्या पत्नीला मुलगा आणि मुलीकडून मारहाण होत असे त्याचबरोबर मुलाचा सासरा देखील हेमाडे यांना मारहाण करत असल्याचं योगिता हेमाडे यांनी म्हटले. त्यांच्यामुळेच माझ्या पतीने आत्महत्या केली असल्याचं म्हटलं असून त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
पत्नी योगिता हेमाडे यांच्या तक्रारीवरून मुलगा यश हेमाडे, सून भाग्यश्री हेमाडे, मुलगी प्रियांका खोपकर आणि मुलगा यश हेमाडे यांचे सासरे मल्लिकार्जुन उमडी यांच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी मुलगा यश हेमाडे आणि मुलगा यश यांचे सासरे मल्लिकार्जुन उमडी या दोघांना अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींबाबत आणि या प्रकरणातील इतर पैलूंबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मालमत्तेच्या वादातून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आत्महत्येपर्यंत जाण्याची वेळ आल्याचा पत्नीचा आरोप आहे. या प्रकरणात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असून, पोलीस तपासातून आणखी कोणते खुलासे होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या धक्कादायक घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, आरटीओ अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.