Explained: सोन्याची शुद्धता कशी ओळखायची? हॉलमार्क असूनही कशी होते भेसळ? ;खरेदीपूर्वी 'या' गोष्टी तपासा!
सोन्यात रेनियम आणि इरिडियमची भेसळ करून वजन वाढवले जात असल्याचा दावा केला जातोय. हॉलमार्किंग आणि XRF मशीनच्या मर्यादा काय? BIS चे नियम आणि ग्राहकांनी घ्यायची काळजी जाणून घ्या.
सोन्याच्या शुद्धतेची खात्री करण्यासाठी ग्राहक हॉलमार्क आणि ज्वेलर्सकडील तपासणी मशीनवर विश्वास ठेवतात. मात्र, सोन्यात रेनियमसारख्या जड धातूंची भेसळ करून वजन वाढवले जात असल्याच्या प्रकारामुळे पारंपारिक तपासणी पद्धतींबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, काही चाचण्यांमध्ये भेसळ असलेले दागिने 22 कॅरेटचे असल्याचे दाखवण्यात आले. सोन्याच्या भेसळीचा या प्रकरणात नेमके काय घडले आणि ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?, जाणून घेऊया.
सोन्याच्या भेसळीचा नवा प्रकार चर्चेत
सोन्याच्या दागिन्यांमध्ये रेनियम (Rhenium) आणि इरिडियम (Iridium) यांसारख्या जड धातूंची भेसळ करून त्यांचे वजन वाढवले जात असल्याचा दावा समोर आला आहे. या धातूंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची घनता सोन्याच्या जवळपास किंवा त्यापेक्षा अधिक असते. त्यामुळे दागिन्यांचे वजन वाढू शकते; मात्र त्यातील प्रत्यक्ष सोन्याचे प्रमाण त्या प्रमाणात वाढत नाही. ग्राहक दागिन्यांच्या एकूण वजनानुसार पैसे देत असल्याने त्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे हॉलमार्किंग आणि सोन्याची शुद्धता तपासण्याच्या पारंपरिक पद्धतींबाबत चर्चा सुरू झाली आहे.
राजस्थानमधील प्रयोगातून काय समोर आले?
राजस्थानमधील जोधपूर येथे रेनियम पावडर वापरून सोन्यात भेसळ करण्याचा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात एक ग्रॅम रेनियम पावडर 7.83 ग्रॅम शुद्ध सोन्यात मिसळण्यात आली. त्यानंतर दागिना तयार करण्यासाठी इतर मिश्रधातूंचाही वापर करण्यात आला. तयार दागिन्याचे वजन 9.58 ग्रॅम झाले. या दागिन्याची तपासणी केली असता त्याला 22 कॅरेटचा हॉलमार्क मिळाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष सोन्याचे प्रमाण सुमारे 81.7 टक्के असल्याचे तपासणीत आढळले.
रेनियम म्हणजे काय?
रेनियम हा दुर्मिळ आणि जड धातू आहे. त्याची घनता प्रति घन सेंटीमीटर सुमारे 21 ग्रॅम आहे, तर शुद्ध सोन्याची घनता सुमारे 19.3 ग्रॅम असते. त्यामुळे सोन्यात रेनियम मिसळल्यास दागिन्याचे वजन वाढू शकते. रेनियमचा वापर प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात, विशेषतः विमानांच्या इंजिनांसारख्या उच्च तापमान सहन करणाऱ्या उपकरणांमध्ये केला जातो. या धातूचा वापर सोन्याच्या भेसळीसाठी केला जात असल्याचे वृत्त समोर आल्याने सराफा बाजारात चिंता व्यक्त होत आहे.
XRF मशीन भेसळ का ओळखू शकत नाही?
अनेक सराफा दुकानांमध्ये सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक्स-रे फ्लुरोसन्स (XRF) मशीन वापरली जाते. ही मशीन दागिन्याच्या पृष्ठभागावरील धातूंचे घटक तपासून सोन्याचे प्रमाण दर्शवते. मात्र, दागिन्याच्या आतील भागात वेगळ्या धातूंचे मिश्रण असल्यास केवळ पृष्ठभागावरील चाचणी संपूर्ण दागिन्याची शुद्धता दाखवेलच असे नाही. मशीनची क्षमता, कॅलिब्रेशन आणि तपासणीची पद्धत यांचाही निकालावर परिणाम होतो. त्यामुळे एक्सआरएफ चाचणी उपयुक्त असली तरी प्रत्येक परिस्थितीत ती अंतिम पुरावा ठरत नाही.
हॉलमार्क असूनही फसवणूक होऊ शकते का?
जोधपूरमधील प्रयोगात तयार केलेल्या दागिन्याला 22 कॅरेटचा हॉलमार्क मिळाल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे हॉलमार्किंग प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित झाले. हे ओळखण्यासाठी भारतीय मानक ब्युरो अर्थात BIS कडून मान्यताप्राप्त तपासणी केंद्रांमध्ये निर्धारित पद्धतीने चाचण्या केल्या जातात. बीआयएसच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक्सआरएफ चाचणी ही प्राथमिक पद्धत असून प्रत्यक्ष सोन्याचे प्रमाण निश्चित करण्यासाठी फायर असे ही अधिक अचूक संदर्भ पद्धत मानली जाते.
गैरप्रकार आढळल्यास काय करायचं?
सोन्यात रेनियम आणि इरिडियमसारख्या धातूंच्या कथित भेसळीबाबत ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने बीआयएसला सतर्क केले आहे. ग्राहकांनी घाबरून न जाता सावध राहावे, असे काऊन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी म्हटलंय. सराफांनी उत्पादक आणि घाऊक विक्रेत्यांकडून खरेदी केलेल्या सोन्याची गुणवत्ता काटेकोरपणे तपासावी, असेही त्यांनी सांगितले. संशयास्पद भेसळ किंवा गैरप्रकार आढळल्यास बीआयएएस आणि जीजेसीकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नेमके किती सोने असते?
22-कॅरेट सोन्याचा अर्थ असा की, जर तुम्ही 24-कॅरेट सोन्याचे 24 भाग केले, तर त्यापैकी 22 भाग सोने असते आणि उरलेल्या 2 भागांमध्ये चांदी, तांबे आणि थोड्या प्रमाणात जस्त (झिंक) असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, यात 24 भागांपैकी 22 भाग सोने असते. जर आपण शालेय गणिताचा वापर करून 24 भागांना 100% मानले, तर 24 पैकी 22 भाग म्हणजे 91.6% होतात. याचा अर्थ असा की, 22-कॅरेट सोन्यात 91.6% सोने असते आणि उरलेला भाग चांदी व तांब्याचा असतो, जे सोन्याला मजबुती देण्यासाठी मिसळले जातात. म्हणूनच 22-कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर '916' असा हॉलमार्क असतो, जो त्यात 91.6% सोने असते. जेव्हा सोन्याच्या दागिन्यांमध्ये हिऱ्यांसारखे खडे जडवायचे असतात, तेव्हा त्या दागिन्यांना अधिक मजबूत बनवणे आवश्यक असते; यासाठी त्यात अधिक प्रमाणात चांदी आणि तांबे मिसळावे लागते. परिणामी, हिऱ्यांचे दागिने सहसा 18-कॅरेट सोन्यापासून बनवले जातात—ज्यात 24 पैकी 18 भाग सोने असते आणि उरलेल्या 6 भागांमध्ये चांदी, तांबे व थोडे जस्त असते. 24 पैकी 18 भाग म्हणजे 75% सोने, म्हणून 18-कॅरेट दागिन्यांवर 750 असा हॉलमार्क असतो, जो 75% सोन्याचे प्रमाण दाखवतो. तांत्रिकदृष्ट्या सोने 14 किंवा 20 कॅरेटसारख्या विविध प्रकारांत घडवता येत असले, तरी बहुतेक दागिने हे 22-कॅरेट किंवा 18-कॅरेट सोन्यापासूनच बनवले जातात.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
दागिने खरेदी करताना केवळ दुकानातील मशीनच्या चाचणीवर अवलंबून राहू नये. दागिन्यावरील सहा अक्षरी-अंकी एचयूआयडी क्रमांक बीआयएस केअर अॅपमध्ये तपासावा. त्यातून दागिन्याची शुद्धता, प्रकार, ज्वेलर आणि तपासणी केंद्राची माहिती मिळू शकते. खरेदीची पक्की जीएसटी पावती घ्यावी. त्यावर दागिन्याचे वजन, कॅरेट, सोन्याचा दर आणि घडणावळ यांचा तपशील असावा. संशय असल्यास बीआयएस मान्यताप्राप्त परख आणि हॉलमार्किंग सेंटरमध्ये दागिन्याची स्वतंत्र तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.