लग्न कसं टिकवून ठेवावं? कॉलेजचा तरुणांसाठी कोर्स;सुखी संसाराचे शिकवणार धडे!
गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सच्या ह्युमन डेव्हलपमेंट अँड फॅमिली स्टडीज विभागाच्या वतीने हा अभ्यासक्रम आयोजित केला जाणार आहे.
लग्न म्हटलं की कपडे, दागिने, हॉल, पाहुण्यांची यादी आणि इतर तयारी सुरू होते. मात्र, लग्नानंतरच्या आयुष्याची आणि नात्यातील जबाबदाऱ्यांची तयारी किती जण करतात? हाच प्रश्न उपस्थित करत एका महाविद्यालयाने तरुणांसाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. वैवाहिक नाते कसे टिकवून ठेवावे? याबद्दल गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सने ‘मॅरेज रेडीनेस : प्रिपेअरिंग फॉर हेल्दी अँड लास्टिंग रिलेशनशिप्स’ हा 15 दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम जाहीर केलाय. यात तरुणांना केवळ विवाहासाठी नव्हे, तर निरोगी आणि दीर्घकाळ टिकणारे नाते निर्माण करण्यासाठी आवश्यक गोष्टी समजावून सांगितल्या जाणार आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया
गोव्यातील कॉलेजचा अनोखा उपक्रम
गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सच्या ह्युमन डेव्हलपमेंट अँड फॅमिली स्टडीज विभागाच्या वतीने हा अभ्यासक्रम आयोजित केला जाणार आहे. हा कोर्स 2 ते 17 डिसेंबर 2026 या कालावधीत होणार आहे. ‘मॅरेज रेडीनेस’ म्हणजे लग्नसमारंभाची तयारी नव्हे, तर वैवाहिक आयुष्यातील भावनिक, सामाजिक आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे कॉलेजचे प्राचार्य महेश पै यांनी सांगितले.
जोडीदाराला समजून घेण्यावर भर
लग्नापूर्वी स्वतःच्या स्वभावाची, अपेक्षांची आणि भावनांची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर जोडीदाराच्या भावना समजून घेणे, एकमेकांचा आदर करणे आणि नात्यात बांधिलकी जपणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमातून तरुणांना याच बाबींची ओळख करून दिली जाणार आहे. लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी मानसिक तयारी कशी असावी, यावरही भर दिला जाणार आहे.
कशावर मार्गदर्शन?
या कोर्समध्ये डेटिंगचा उद्देश आणि त्यातील बदलते पैलू, स्वतःची ओळख, नात्यांमधील भावनिक गरजा, स्त्री-पुरुषांच्या भूमिका आणि त्यांचा संबंधांवर होणारा परिणाम अशा विषयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ‘वेडिंग’ म्हणजे विवाहसोहळा आणि ‘मॅरेज’ म्हणजे आयुष्यभर निभावायची भागीदारी, यातील फरकही समजावून सांगितला जाणार आहे.
कोणाला घेता येणार कोर्समध्ये प्रवेश?
महाविद्यालयाच्या माहितीनुसार, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, अविवाहित तरुण-तरुणी तसेच निरोगी नातेसंबंध समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या इतर व्यक्तींनाही या कोर्समध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम केवळ लग्न ठरलेल्या जोडप्यांसाठी मर्यादित नसून नातेसंबंधांविषयी समज वाढवू इच्छिणाऱ्यांसाठीही खुला आहे.प्रवेश प्रक्रिया, शुल्क आणि अर्जाची अंतिम तारीख याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
घटस्फोटांची प्रकरणे कमी करण्याचा उद्देश
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यभर विवाहपूर्व समुपदेशन सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचे अलीकडेच सांगितले होते. घटस्फोटांची प्रकरणे कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना पुढे आणली जातेय. गोवा राज्याच्या कायदा विभागाच्या आकडेवारीनुसार, 2022 ते 2025 या काळात राज्यातील दिवाणी न्यायालयांमध्ये विवाह आणि घटस्फोटाशी संबंधित 3 हजारांहून अधिक याचिका दाखल झाल्या. 2024 मध्ये एकट्या वर्षात 947 याचिका दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या उपक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे. करिअरसाठी अनेक वर्षे तयारी करणारे तरुण वैवाहिक आयुष्यासाठीही संवाद, समजूतदारपणा आणि जबाबदारीची तयारी करतील, अशी अपेक्षा या उपक्रमातून व्यक्त केली जात आहे.