Player Of The Match Award IND VS NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना 4 नोव्हेंबर रोजी खेळवला गेला. या सामन्यात सुरुवातीला गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केलं आणि त्यानंतर शुभमन गिल अन विराट कोहली या दोघांनी फलंदाजीत उत्तम कामगिरी केली. या सामन्यात अर्शदीप सिंहने 4 विकेट घेतले तर विराटने 51 बॉलमध्ये 74 धावा केल्या. मात्र असं असूनही 2 विकेट घेणारा अंशुल कंबोज हा प्लेअर ऑफ द मॅच ठरला. या वेगवान गोलंदाजाने या सामन्यात दोनच विकेट घेतले असं असूनही विराट आणि अर्शदीपला डावलून त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड का देण्यात आला याविषयी जाणून घेऊयात.
अंशुल कंबोज बनला प्लेअर ऑफ द मॅच :
अंशुल कंबोजला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे त्याची किफायतशीर गोलंदाजी. त्याने आपल्या 10 ओव्हरमध्ये केवळ 22 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या. त्याची गोलंदाजी इतकी प्रभावी होती की त्याने 46 डॉट बॉल्स टाकले म्हणजेच 46 बॉल त्याने एकही धाव दिली नाही. या खेळाडूने ऑकलंडमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने आपल्या 'शॉर्ट ऑफ लेंथ' बॉलिंगने न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठ्या अडचणीत आणले. अंशुल कंबोजने मिचेल सँटनर आणि नॅथन स्मिथ यांच्या विकेट्स घेतल्या.
अंशुल कंबोजने गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ज्या सामन्यात त्याने 82 धावा दिल्या होत्या. आता पुन्हा संधी मिळाल्यावर त्याने आपल्या कारकिर्दीतील केवळ दुसऱ्याच सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' हा पुरस्कार पटकावला आहे. अंशुल कंबोजने फक्त 2 विकेट घेऊन प्लेअर ऑफ द मॅच बनणारा 7 वा भारतीय गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहला 2 वेळा 2 विकेट घेण्यासाठी प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब मिळाला आहे. अनिल कुंबळे यांना 1990 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एका वनडे सामन्यात 2 विकेट घेतल्याबद्दल पहिल्यांदा 'प्लेअर ऑफ द मॅच' हा पुरस्कार मिळाला.