आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. डेटा आणि डिजिटल सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या इनोडेटा कंपनीने भारतातील जवळपास 550 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचे वृत्त आहे. 26 ऑक्टोबर रोजी कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाले; मात्र काही तासांतच त्यांच्या अधिकृत लॅपटॉपमधून लॉगआउट झाले, यानंतर कंपनीचे ई-मेल आणि आयडी अचानक बंद झाले. सुरुवातील त्यांना काय सुरु आहे कळेना. पण काही कळायच्या आतच त्यांना वैयक्तिक ई-मेलवर नोकरी संपुष्टात आणल्याचे मेसेज आल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केलाय. या घटनेमुळे अचानक नोकरी जाणे, पगाराची कागदपत्रे आणि पूर्ण-अंतिम सेटलमेंट यांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कर्मचाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबरला दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे झाली. त्यांनी कंपनीच्या सिस्टिममध्ये लॉगिन केले आणि उपस्थिती नोंदवून काम सुरू केले. मात्र, दुपारच्या सुमारास फिलिपिन्समधील कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर भारतातील कर्मचाऱ्यांनाही कंपनीच्या सिस्टिममध्ये प्रवेश करता येत नसल्याचे लक्षात आले. ही कारवाई अचानक झाल्याने अनेकांना नेमके काय घडत आहे, याची माहिती मिळवण्यासाठी व्यवस्थापक आणि एचआर विभागाशी संपर्क साधावा लागला.
भारतामध्ये जवळपास 550 कर्मचारी या कर्मचारी कपातीमुळे प्रभावित झाले. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. इनोडेटाने भारतातील आणि फिलिपिन्समधील कर्मचारी कपातीची एकूण संख्या अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. दरम्यान कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये संध्याकाळपर्यंत जवळपास 500 जण सहभागी झाल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
संबंधित कर्मचाऱ्याला नेमून दिलेल्या व्यावसायिक कामाचा आवाका कमी झाल्यामुळे त्याची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले. हा निर्णय वैयक्तिक कामगिरीशी संबंधित नसून व्यावसायिक आणि कार्यकारी गरजांमुळे घेतल्याचेही त्या पत्रात नमूदआहे. मात्र, नेमका कोणता प्रकल्प कमी करण्यात आला, किती विभागांतील कर्मचारी प्रभावित झाले आणि निर्णयामागील संपूर्ण कारण काय, याची माहिती समोर आली नाही. एका कर्मचाऱ्याचे काम संपुष्टात आल्याचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले.
कंपनीचे अधिकृत लॉगिन आणि एचआर पोर्टल बंद झाल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना पगाराच्या स्लिप, रोजगाराशी संबंधित कागदपत्रे आणि इतर नोंदी डाउनलोड करता आल्या नसल्याचे सांगण्यात आले. सेवासमाप्ती पत्रात पूर्ण-अंतिम सेटलमेंटची प्रक्रिया आणि कंपनीची मालमत्ता परत करण्याबाबत उल्लेख असल्याचे वृत्त आहे. नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता थकीत वेतन, नोटीस कालावधी, सेटलमेंट आणि आवश्यक कागदपत्रे मिळवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इनोडेटाच्या फिलिपिन्समधील कर्मचाऱ्यांनाही याच काळात नोकरी गमवावी लागल्याचे वृत्त आहे. काही कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन मंचांवर कर्मचारी कपातीबाबत अनुभव मांडले आहेत.