मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. पुढचे सात दिवस पाणी उकळून प्यावे, असं अवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. पिसे-पांजरापूर संकुलातील येवई येथील जलाशयाच्या कप्पा क्रमांक 2 चे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. हा कप्पा बुधवारी 28 ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून त्यामुळं पाण्याची गुणवत्ता ढासळू शकते. त्यामुळं पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळून पिण्याचे अवाहन करण्यात येत आहे.
मुंबई शहर, पूर्व उपनगरे तसेच ठाणे आणि भिवंडी महापालिका क्षेत्रांत आज, बुधवारपासून वितरित होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिका पिसे-पांजरापूर संकुलातील येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या कप्पा क्रमांक 2 च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, हा कप्पा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेचा परिणाम पाण्याच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई शहरातील ए विभागातील नेव्हल डॉकयार्ड आणि बीपीटी परिसरासह बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागांत पाणी उकळून पिण्याच्या सूचनेची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
पूर्व उपनगरांतील टी विभागातील मुलुंड पूर्व आणि पश्चिम, एस विभागातील भांडुप, नाहूर, कांजुरमार्ग आणि विक्रोळी पूर्व, एन विभागातील विक्रोळी व घाटकोपर परिसर, एल विभागातील कुर्ला पूर्व तसेच एम पूर्व आणि एम पश्चिम विभागांचाही यात समावेश आहे.
नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय जलशक्तिमंत्री सी. आर. पाटील यांनी मंगळवारी घेतला. नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला केंद्रीय जलशक्तिमंत्री सी. आर. पाटील, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहनलाल यादव आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित होते.
मुंबईतील टँकर लॉबी आणि पाणी वितरणातील गडबडी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने 33 हायड्रंटवर डिजिटल फ्लो मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लो मीटर बसवल्याने किती पाणी वितरित झाल्याचे अचूक मोजमाप करणे शक्य होणार आहे. यामुळे पाणीपुरवठ्यातील अनियमितता रोखण्यासह टँकर लॉबीला लगाम घालणे शक्य होणार आहे.