'अकवान'ने दिशा बदलली, चक्रीवादळ अधिक तीव्र, पुढचे 24 तास महत्त्वाचे; महाराष्ट्रातील 'या' भागात वादळी पाऊस होणार?
बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि लगतच्या नैर्ऋत्य भागात निर्माण झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे 'अक्वान' या नावाच्या तीव्र चक्रीवादळात रूपांतर
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळं राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, यामुळं राज्यातील हवामानातही चढ-उतार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात 20 दिवसांत तिसरे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. अग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून 1.5 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचाच परिणाम राज्यावर होण्याची शक्यता आहे. राज्यात अलीकडेच थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप कडाक्याची थंडी जाणवू लागली नाहीये. चक्रीवादळामुळं पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात आज अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार राहणार असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसंच, अकवान चक्रीवादळामुळं विदर्भात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने शनिवारपासून विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, अकवान चक्रीवादळाने बुधवारी अतितीव्र रुप धारण केले आहे. ही वादळ प्रणाली पूर्व किनाऱ्याकडे झेपावत असून वादळाची दिशा बदलल्याने शुक्रवारी दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या नरसापूर आणि ओडिशाच्या पूरी दरम्यान किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आज पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात या चक्रीवादळाची तीव्रता कायम राहणार आहे. शुक्रवारी 20 नोव्हेंबर दुपारपर्यंत अतितीव्र चक्रीवादळ उत्तर दिशेकडे सरकून आंध्र प्रदेश आणि यानमच्या नरसापूर आणि ओडिशाच्या पुरी दरम्यान किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीला धडकताना वाऱ्याचा वेग ताशी 90 ते 100 किमी राहणार असून ताशी सुमारे 110 वेगाने वाऱ्याचे झोत येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होणार
या वादळामुळं तामिळनाडू, आंध्र प्रदेश किनारपट्टी, ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, विदर्भ आणि मध्य प्रदेशात हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.